विषय शिक्षकही रुजू व्हायला तयार नाहीत : कर्मचाऱ्यांना जिवती तालुक्याची अॅलर्जीसंघरक्षित तावाडे । लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : गेल्या चार ते पाच वर्षांपासून जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या न झाल्याने त्याचा फटका अतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्या शिक्षकांना नेहमीच सहन करावा लागला आहे. बदली प्रक्रिया होत नसल्याने त्याच दुर्गम ठिकाणी किती वर्ष काढायचे हा प्रश्न त्यांना पडतो आहे. जिवतीसारख्या दुर्गम तालुक्यात अनेक शिक्षकांना १३ ते १४ वर्षे झालीत. तरीही त्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. कारण यात राजकारण आड येत आहे. चंद्रपूरजवळ असलेल्या शिक्षक संघटना या मजबूत असून संघटनेचे पदाधिकारी नेत्यांच्या नेहमी संपर्कात असतात. त्यातच जिवतीसारख्या दुर्गम भागात जाण्याची त्यांच्यात असलेली ‘अॅलर्जी’ हे सर्व कारणे यासाठी कारणीभूत आहेत. विषय शिक्षकांच्या बाबतही तसेच आहे. नुकत्याच विषय शिक्षकांच्या बदल्या झाल्या. यामध्ये जिवती तालुक्यातून ७८ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यांच्या ठिकाणी ७८ ऐवजी केवळ नऊ शिक्षकच आले. बाकी शिक्षक अजूनही आले नाहीत. त्यामुळे त्यांच्यात जिवती तालुक्याबद्दल अॅलर्जी तर दिसतेच. परंतु विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. विषय शिक्षक पदस्थापना पूर्णता चुकीची झाल्यामुळे तालुक्यावर अन्याय झाला असून उर्वरित ६९ पदे खाली आहेत. त्याचे काय? विषय शिक्षक समुपदेशनाने न पाठविता रिक्त जागेवर त्यांना पाठविले असते तर जिल्ह्यातील सर्व शाळांना विषय शिक्षक मिळाले असते, असे मत पंचायत समिती उपसभापती महेश देवकते यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.तालुक्यात अनेक शाळा वर्ग १ ते ८ पर्यंतच्या आहेत. पण त्या शाळेत केवळ १ ते २ शिक्षकच गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत आहेत. याकडे प्रशासन लक्ष देण्याऐवजी, आहे त्याही विषय शिक्षकांच्या बदल्या करीत आहे.
शिक्षकांचा वनवास संपेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2017 12:53 AM