११ एप्रिलपासून उपोषण : महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीचा इशाराचिमूर : पंचायत समिती चिमूर अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या बऱ्याच समस्या अनेक महिण्यांपासून प्रलंबित आहेत. या समस्या सोडवण्यात आल्या नाहीतर साखळी उपोषण करण्याचा इशार महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीने दिला आहे.प्राथमिक शिक्षकांच्या बऱ्याच समस्या आहेत. याबाबत महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती चिमूरच्या प्रतिनिधींनी तोंडी, लेखी निवेदन दिले. तसेच धरणे आंदोलन केले. तसेच चिमूर येथील संवर्ग विकास अधिकारी तसेच गट शिक्षणाधिकारी यांची भेट घेवून समस्या लक्षात आणुन दिली.परंतु, प्रशासनाच्या वेळ काढु धोरणामुळे शिक्षकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची माहिती महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती चिमूरचे अध्यक्ष मधुकर दडमल तसेच सचिव गोविंद गोहणे यांनी दिली.माहे फेब्रुवारी २०१७ चे वेतनाचे आवंटन पंचायत समितीला २७ मार्चला प्राप्त झाले. परंतु गट शिक्षणाधिकारी यांनी १ एप्रिल पर्यंत वेतन देयकांवर स्वाक्षरी करून लेखा विभागाला देयके सादर न केल्याने एप्रिल महिण्याचा पहिला आठवडा संपत आला. पण वेतन झाले नाही.त्यामुळे शिक्षकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे दोन-दोन महिने वेतन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाई का करण्यात येत नाही, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.सहावा वेतन आयोग तफावत रक्कमेचे हप्ते भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्याकरीता वर्ष २०१५-१६ मध्ये निधी असुनसुद्धा शिक्षण विभागाने देयके सादर न केल्याने मागील वर्षी रक्कम परत करण्याची नामुष्की प्रशासनाला आली. रक्कम पुन्हा प्राप्त होण्याकरिता व सदर हप्ते जीपीएफला जमा करण्याकरिता पुरोगामी शिक्षक समितीने जिल्हा परिषद प्रशासनाला पत्रव्यवहार केला. यावर्षी पुन्हा रक्कम प्राप्त झाली. परंतु आर्थिक वर्ष संपले. तरी अजूनही रक्कम जीपीएफला जमा करण्यात आली नाही. याकडे अधिकाऱ्याचे दुर्लक्ष होत आहे. तसेच सुनंदा मोहोड यांचे आजारी रजेचे प्रकरण तीन चार वर्षापासून निकाली निघाले नाही. पंचायत समिती चिमूर व जिल्हा परिषदमधुन कागदपत्रे गहाळ होतात. याबाबत कुणालाही थांगपत्ता लागत नाही. तसेच पंचायत समितीच्या सेवा पुस्तकाला नोंदी घेण्यास टाळाटाळ केल्या जाते. डीसीपीएसधारक शिक्षकांच्या नावात व क्रमांकात बराच घोळ आहे. अवघड क्षेत्र वा सोपे क्षेत्र या संबंधाने अपेक्षाकरिता यादी लावली नाही. एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटूनही समस्या निवारण सभा घेण्यात आली नाही.समस्या निकाली न निघाल्यास ११ एप्रिलपासून पं.स. चिमूर येथे साखळी उपोषण करणार असल्याची माहिती मधुकर दडमल, गोविंद गोहणे यांनी दिलीे. (तालुका प्रतिनिधी)
शिक्षकांच्या प्रलंबित समस्यासाठी साखळी उपोषण करणार
By admin | Published: April 06, 2017 12:35 AM