घोडाझरी अभयारण्य परिसरात वृक्षतोड
तळोधी बाः नागभीड तालुक्यातील घोडाझरी अभयारण्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची तोड होत आहे. याच संदर्भात गुप्त माहितीच्या आधारे उपवनसंरक्षक ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनात नियतक्षेत्र हुमामधील मधुकर सातपैसे, रा.मांगरुड यांच्या शेतात गट क्रं.१६३ मध्ये तणसाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवलेली लाखो रुपये किमतीची सागाची लाकडे जप्त करण्यात आली.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा अशाच प्रकारे त्याच परिसरात लपविलेले सागवानाची लाकडे पकडून जप्तीची कारवाई करण्यात आली.
या कारवाईनंतर वनपरिक्षेत्र नागभीड मधील मंगरुड बिटात येत असलेल्या रानबोळी व डोंगरकडा (ढोरकळा), खरबी तलाव पाळ परिसरात व घोडाझरी या घनदाट जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
यासंदर्भात वनविभागाने कारवाईचे सत्र चालविले असून दररोजच्या कारवाईत लाकूड मिळत असून चौकशी सुरू असल्याने वनविभागाने काही माहिती देण्याचे तूर्तास टाळले आहे. यासंदर्भात वनविभागाचे उपवनसंरक्षक व वनपरिक्षेत्र स्तरावरून विचारणा केली असता चौकशी व कार्यवाही सुरू असल्याने सध्यातरी सविस्तर माहिती देण्यास असमर्थता विषद केली आहे.