राजुरा : वनाधिकाऱ्यांनी गस्तदरम्यान एका ठिकाणी आढळून आलेले सागवान जप्त केले. सागवानाची किंमत १० हजार ६७० रुपये आहे.
राजुरा नियत क्षेत्राचे वनरक्षक मनोज वानखेडे, वनमजूर शामराव खेडेकर, कोंडू मेश्राम, गंगाराम भेंडारे, नरेश निखाडे हे रविवारी सकाळी गस्त करीत असताना नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक १५५ मध्ये झुडपात सागवान झाडाचे तोडलेले लाकडे दिसून आली. तपासणी केली असता १० हजार ६७० रुपये किमतीचे ०.१५५ घनमीटर असलेले चार सागवान झाडाचे तुकडे आढळून आले. हे सागवान जप्त करून अज्ञात आरोपीविरुद्ध वन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, या क्षेत्रात इतर झाडाची तोड झाली का, याचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, उपविभागीय वन अधिकारी अमोल गरकल, वनक्षेत्रपाल विदेशकुमार गलगट यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.