ब्रह्मपुरी : शहरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात सट्टा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. सट्टा लावणारे कमी वेळात अति पैशांच्या हव्यासापायी याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. त्यामुळे तालुक्यातील ्रआबालवृद्धांसह तरुणाई धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सट्ट्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाली आहेत. यावर पोलीस प्रशासनाने आळा घालण्याची मागणी आता जोर धरत आहे.
संपूर्ण तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून सट्टापट्टी व्यवसाय जोमात सुरू आहे. ज्यावेळी केवळ साधे मोबाइल चलनात होते त्यावेळी सट्टा मालकांकडून पट्टी जमा करण्याकरिता तालुक्यातील चारही बाजूला माणसे पाठवून पट्टी गोळा करण्यात येत होती व भ्रमणध्वनीवरून संपूर्ण पट्टीवर सांगितली जात होती. कालांतराने व्हॉट्सॲपचे चलन मोठ्या प्रमाणात सुरू झाले. त्यामुळे आता सट्टापट्टी व्हॉट्सॲपवर मागितली जाते तसेच पाठविलीही जाते. एकंदरीत सट्टा व्यवसाय ऑनलाइन झाला आहे.
ऑनलाइन निकाल पाहणेही आता प्रत्येकाला शक्य झाल्याने कोणताही संपर्क न साधता निकालही पाहता येतो. ऑनलाइन सट्टा व्यवसायाने मात्र, अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात सट्टा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, मजुरी करणारे नागरिक, तरुण, शालेय विद्यार्थी, तसेच महिलासुद्धा सट्टा लावताना दिसून येतात. दिवसभराची अनेकांची मजुरी सट्ट्यात जात आहे, तर कर्तेपुरुष नादाला लागून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.