आनंद भेंडेचंद्रपूर : राजुरा तालुक्यातील मूर्ती येथे ग्रीनफिल्ड एअरपोर्ट तयार करण्याचा मार्ग सूकर झाला आहे. शासन व विमान प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या विशेष पथकाने मूर्ती येथे येऊन पाहणी व तपासणी केली. त्यानंतर सदर प्रस्तावाला तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे वीज, सिमेंट, कोळसा, लाकूड, लोखंड, पेपरमील, आयुध निर्माणी असे विविध प्रकारचे कारखाने आहेत. या सर्व कारखान्याचे संचालन मुंबई, दिल्ली, कलकत्ता, मद्रास, बंगरुळ, अहमदाबाद येथून चालते. त्यांना येण्या-जाण्यासाठी विमानाची सोय नसल्यामुळे जाणे येणे फारच अवघड ठरत आहे. त्यामुळे बरेच कारखाने सुरू करण्यासाठी उद्योजक उत्सुक नाहीत. कारखानदार संचालकांना जाणे येणे करण्यासाठी विमान किंवा त्यांचे खासगी हेलीकॉप्टर असतानासुद्धा विमानतळाची सोय नसल्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.ही बाब राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार संजय धोटे यांनी लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्ह्यात विमानतळाची निर्मिती करण्यासाठी पाऊल उचलले. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात शासनाची जमीन कोठे उपलब्ध आहे, याचा शोध घेतला व राजुरा तालुक्यातील मूर्ती येथे एक हजार चाळीस एकर जमिनीचे सर्वेक्षण करून अहवाल शासनाच्या भारतीय विमान प्राधिकरण नवी दिल्ली यांच्याकडे पाठविला. त्यानुसार शासन व विमान प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या विशेष पथकाने मूर्ती येथे येऊन जागेची पाहणी केली. नुकताच त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून दोन टप्यात काम करण्यास तांत्रिक मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात ७२० एकर जमिनीची आवश्यकता असून दुसऱ्या टप्प्यात पुन्हा १२० एकर जागा, अशी एकूण ८४० एकर जमीन लागणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शासनाची मान्यता मिळताच मूर्ती येथे प्रस्तावित ग्रीनफिल्ड एअरपोर्टचे काम लवकरच सुरू होणार आहे. मूर्ती येथील प्रस्तावित ग्रीनफिल्ड एअरपोर्टमुळे चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली व तेलंगणातील आदिलाबाद, आसिफाबाद व मंचेरियल येथील लोकांना विमान प्रवास करणे सोयीचे होणार आहे.शासन व विमान प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या विशेष पथकाने मूर्ती येथे येऊन जागेची पाहणी केली आहे. नुकताच त्यांचा अहवालही प्राप्त झाला असून शासनाची संपूर्ण मान्यता मिळताच एअरपोर्टचे काम सुरू होणार आहे.-रवींद्र होळी,तहसीलदार, राजुरा.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूर्ती येथे ग्रीनफिल्ड एयरपोर्टला तांत्रिक मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 2:24 PM
शासन व विमान प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या विशेष पथकाने मूर्ती येथे येऊन पाहणी व तपासणी केली. त्यानंतर सदर प्रस्तावाला तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.
ठळक मुद्देकारखानदारांचा विमान प्रवास होणार सोईचा