धान्य वाटप घोटाळा भोवला : गडचिरोली येथे तडकाफडकी बदलीचिमूर : शासकीय धान्य वितरणात गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरुन चिमूरचे तत्कालीन तहसीलदार नीलेश काळे यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. त्यांची गडचिरोली येथे बदली करण्यात आली असून निलंबन काळात त्यांना गडचिरोली मुख्यालयात राहावे लागणार आहे.चिमूर तहसील कार्यालयांतर्गत स्वस्त धान्य वितरण प्रणाली योजनेअंतर्गत तालुक्यातील धान्य दुकानात तांदूळ, गहू शिधापित्रकेवर वितरणाची आणि त्यांच्यावर देखरेखीची जबाबदारी काळे यांच्यावर होती. परवानेसुद्धा काळे यांच्या स्वाक्षरीनेच दिले जात होते. मात्र, तांदूळ आणि गहू वितरणात चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला.चिमूर व भिसी पोलीस ठाण्यात यासंदर्भात भादंवि ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ (बी.) सहकलम ३, ७ जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत दोन वर्षापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे होता. ३ फेब्रुवारी २०१५ ला तपास पथकाने चिमूर येथून तहसीलदार नीलेश काळे यांना अटक केली व न्यायालयात हजर केले. काळे याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. नुकतेच ते जामिनावर सुटले, आणि चिमूर येथे रुजू होताच त्यांच्या निलंबनाचे आदेश धडकले. निलंबित काळात त्यांचे मुख्यालय गडचिरोली येथे देण्यात आले आहे. काळे यांच्या काळातच चिमूर तालुक्यात स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ-गहू घोटाळा उघडकीस आला होता. अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते. प्रकरणाचा सखोल तपास झाल्याने काळे यांनाही अटक झाली होती. (तालुका प्रतिनिधी)
चिमूरचे तहसीलदार अखेर निलंबित
By admin | Published: April 08, 2015 12:01 AM