यावर्षी अगदी मृग नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी केली. पीक जोमाने आले. मात्र सद्यस्थितीत १५ ते २० दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परिणामी कपाशीसह, सोयाबीन, धान, तूर आदी पिके संकटात सापडली असून काही ठिकाणी ती करपतसुद्धा आहेत.
पहिल्या दोन महिन्यात चांगला पाऊस पडल्याने पिके जोमाने आली. यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनला अधिक पसंती दिली असून कापसाची पेरणीही बऱ्यापैकी आहे. सध्या पिके फुलोल्याच्या अवस्थेत आहेत. मात्र पाऊस गायब असल्याने तसेच किडीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सध्या शेतकरी फवारणीच्या कामाला लागले आहेत. मात्र पाऊस न आल्यास हातातील पीक वाया जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या प्रत्येक शेतकरी पावसाची चातकासारखी वाट बघत आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र जोपर्यंत पाऊस कोसळणार नाही, तोपर्यंत काही खरे नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे पिकांवर कीड वाढत आहे. कापसावर मावा, तुडतुडे आदी किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे.
बाॅक्स
धान उत्पादकही आले संकटात
धान उत्पादक जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. धान पिकासाठी भरपूर प्रमाणात पावसाची गरज आहे. शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकून रोवणी केली आहे, तर काही शेतकऱ्यांची अद्यापही पावसामुळे रोवणी रखडली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बाॅक्स
मागील २० दिवसांपासून पाऊस पडलेला नाही. त्यामुळे आता पिकांना पावसाची अत्यंत गरज आहे. पाऊस नसल्यामुळे पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच विविध रोगांचा प्रादुर्भाव आहे. कपाशीवरही कीड आली आहे.
- रमेश बावने
राजुरा
कोट
सुरुवातीला समाधानकारक पाऊस कोसळला. त्यामुळे सर्व दु:ख विसरून शेतकऱ्यांनी पेरणी केली. पिकांची आंतरमशागतही सुरू आहे. मात्र पावसाने विश्रांती घेतल्यामुळे हातात आलेले पीक जाण्याची शक्यता आहे.
- रत्नाकर माळवे
बल्लारपूर
बाॅक्स
११४.५
मि.मी. आतापर्यंत अपेक्षित पाऊस
--
२०
मि.मि. प्रत्यक्ष पडलेला पाऊस