लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दीड वर्षापासून बंद असलेली जिल्ह्यातील मंदिरे आजपासून उघडल्याने नवरात्रोत्सव जणू चैतन्य घेऊन आला आहे. चंद्रपूरची आराध्य देवती माता महाकाली मंदिरात दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी व्यवस्थापनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. सार्वजनिक दुर्गा उत्सव व शारदा मंडळांनी सायंकाळी पूजाविधी, अभिषेक करून घटस्थापना केली. कोविड नियमांचे पालन करून आजपासून मातेचा जागर सुरू झाला आहे.कोरोना संसर्गामुळे सरकारने प्रतिबंध लागू केल्याने जिल्ह्यातील सर्व मंदिरे दीड वर्षापासून बंद होती. कोरोना संसर्ग आता ओसरण्याच्या मार्गावर आला. रुग्णांची संख्या दररोज चार किंवा पाचच्या पुढे जात नसल्याचे दिसून येत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात हेच चित्र असल्याने राज्य सरकारने गुरुवारपासून प्रतिबंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाने या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली. गुरुवारी मंदिरे उघडण्याची परवानगी दिल्याने चंद्रपुरातील माता महाकाली, तसेच जिल्ह्यातील सर्वच मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. विशेष म्हणजे, आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे.
गर्दी करण्यास प्रतिबंध- नवरात्र हा उत्सव देवी दुर्गेला समर्पित असा उत्सव आहे. संस्कृतमध्ये नवरात्री या शब्दाचा अर्थ ‘नऊ रात्री’ असा आहे. मंदिरे उघडण्याचा व नवरात्रोत्सवाचा दिवस एकच असल्याने देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ शकते, असा अंदाज होता. मंदिर व्यवस्थापनांकडून सूचना देण्याचे काम सुरू होते. मात्र, गुरुवारी पहिल्या दिवशी फारशी गर्दी दिसून आली नाही. सार्वजनिक देवी मंडपात गर्दी टाळावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.
दोन हजार पोलीस तैनात- कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने कुठेही कोविड नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने दोन हजार जवान तैनात केले आहेत. शिवाय जिल्हाभरात गृहरक्षण दलाच्या जवानांचीही नियुक्ती करण्यात आली आहे .
लस घेतली असेल तरच मंदिरात प्रवेशकोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मनमार्फत महाकाली मंदिर परिसरात लसीकरण होणार आहे. मंदिरात प्रवेश करताना भक्तांना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक आहे. ज्या भाविकांनी लस घेतलेली नाही, त्यांच्यासाठी महाकाली मंदिर परिसरात लसीकरण होणार आहे. सकाळी सात ते सायकांळपर्यंत लसीकरण मोहीम सुरु राहणार आहे. मंदिर व्यवस्थापन समितीने भाविकांना टोकन देण्यात येणार आहे.