चंद्रपूर : बल्लारपूर शहरातील नगर परिषदेची इमारतदेखील आता नव्या आकर्षक व देखण्या रूपात बल्लारपूरकर जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे. बल्लारपूर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
नगर विकास विभागाच्या १६ जूनच्या शासन निर्णयानुसार बल्लारपूर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर शहराने विकासाचे विविध टप्पे अनुभवले आहे. १९९९मध्ये बल्लारपूर तालुक्याच्या निर्मितीनंतर या शहराच्या विकासाला त्यांनी मोठी गती दिली. अर्थमंत्रिपदाच्या काळात आमदार मुनगंटीवार यांनी, तर बल्लारपूर शहराचा चेहरामोहराच बदलला. विकासकामांची मोठी मालिकाच या शहरात तयार केली. शहरानजीक देशातील अत्याधुनिक अशी सैनिक शाळा साकारली असून, सर्व आवश्यक क्रीडा सुविधांनी परिपूर्ण असे तालुका क्रीडा संकुलदेखील पूर्णत्वास आले आहे. आता नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी दहा कोटी रुपये निधी मंजूर झाल्याने एक नवे विकासकाम या विकासकामांच्या मालिकेत जोडले गेले आहे.