बल्लारपूर : पोलिसांनी बल्लारपूरलगतच्या कारवा जंगलात धाड टाकून दहा लाख ३५ हजारांची देशी दारू जप्त केली. सोमवारी केलेल्या या कारवाईत सिद्धार्थ ऊर्फ बाप्या रंगारी, नागेश मेश्राम, प्रफुल्ल तामगाडगे (सर्व रा. राजेंद्र प्रसाद वॉर्ड) यांना अटक करण्यात आली.
बल्लारपूरलगतच्या कारवा जंगलात दारूची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी कारवा जंगलात धाड टाकून १० लाख ३५ हजार रुपयांची देशी दारू, २६ हजार रुपयांचे तीन मोबाईल असा एकूण १० लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांना अटक केली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी गायकवाड, सापोनि मुलाणी, पीएसआय चेतन टेंभुर्णे, पोहवा आनंद परचाके, पोहवा जिवतोडे, नापोशि सुधाकर वारघणे, शरद कुडे, राकेश, पोशि दिलीप आदे, श्रीनिवास वाबिटकर, शेखर माथनकर, गणेश पुरडकर आदींनी केली.