लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : गडर लाईन प्रकल्पासाठीच्या १२७ कोटी रुपयांच्या टेंडर प्रक्रियेत बनावट दस्तऐवजाचा वापर करून शासनाची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात विशिष्ट कंत्राटदाराने बनावट दस्तावेज तयार करून आणि ब्रह्मपुरीतील नागरिकांना प्रतिनिधी असल्याचे दाखवून टेंडर अपलोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे टेंडर प्रक्रियेतील पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दिनकर शुक्ला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कंत्राटदाराने जिओ टॅग जीपीएस फोटोसाठी दोघांना वेगवेगळ्या लोकेशन्सवर नेले आणि त्यांचे फोटो काढले. नंतर हे फोटो टेंडर प्रक्रियेसाठी सादर करण्यात आले आणि त्यांची बनावट स्वाक्षरी वापरून त्यांना प्रतिनिधी असल्याचे दाखवले गेले. हे सर्वस्वी खोटे असून, त्यांनी कधीही या कंपनीत काम केले नाही. टेंडर प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव दिसून आला असून, बनावट दस्तऐवजांच्या आधारावर एकाच कंपनीला टेंडर देण्याची सेटिंग केली गेली, असा आरोप आहे. वेगवेगळ्या कंत्राटदारांनी टेंडर भरल्याचे भासवून एका व्यक्तीनेच सर्व टेंडर भरल्याचे दस्तावरून उघड होते. १२७ कोटींच्या या प्रकल्पासाठी स्पर्धा होऊन टेंडर कमी दरात मिळाला असता, तर शासनाची मोठी आर्थिक बचत झाली असती, असे तक्रारीत नमुद आहे.
"सदर प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपात काहीही तथ्य असल्याचे दिसत नाही. कंत्राटदार कंपनीला अहवाल मागितला आहे. त्यांचा अहवाल नगरपरिषदेला प्राप्त झालेला आहे. सध्या रजेवर असल्याने त्यात काय उत्तर दिले आहे ते सोमवारी सांगू शकते."- अशिया जुही, मुख्याधिकारी, न. प. ब्रम्हपुरी
"मी नगर परिषदेमध्ये असताना, उपस्थित अधिकाऱ्यांनी व कंत्राटदाराच्या प्रतिनिधीने मला साईटवर जाऊन येऊ असे म्हणाले. त्यामुळे मी साईटवर गेलो. मात्र, त्या ठिकाणी विविध ठिकाणी फोटो काढले गेले. टेंडर प्रक्रियेसाठी सादर केलेल्या दस्तऐवजांवर माझी सही दाखविण्यात आली आहे, जी पूर्णपणे बनावट आहे. मी कधीही त्या कंपनीसाठी कोणतेही काम केलेले नाही."- नंदू धोटे, ब्रह्मपुरी.