लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तेंदूपत्ता संकलन करीत असताना वाघाच्या हल्ल्यात महिला मजूर ठार झाल्याची घटना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील कक्ष क्रमांक १४३ मध्ये मंगळवारी सकाळी ७. ३० वाजताच्या सुमारास घडली. लिलाबाई चंद्रभान जिवतोडे (६०) रा. कोलारा (तु.) असे मृतक महिलेचे नाव आहे. एका महिन्यापूर्वी याच परिसरात सातारा येथील मोहफुल वेचणाऱ्या यमुना गायकवाड या महिलेला वाघाने ठार केल्याची घटना घडली होती. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत कोलारा (तु.) येथील तेंदूपत्ता मजूर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये तेंदुपत्ता संकलनाकरिता जात आहेत. मंगळवारी पहाटे लिलाबाई व पती चंद्रभान हे दाम्पत्य गावातील मजुरांसोबत तेंदूपत्ता संकलनासाठी गेले होते. तेंदुपत्ता तोडत असताना वाघाने लिलाबाईवर हल्ला केला. चंद्रभानने काठीने वाघाला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काही अंतरावर तेंदूपाने तोडणारे अन्य मजूरही मदतीकरिता घटनास्थळावर धावून आले. मात्र, तोपर्यंत लिलाबाईचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने पंचनामा करून मृतक महिलेच्या कुटुंबाला ५० हजारांची तातडीची मदत दिली. पुढील कार्यवाही झाल्यानंतर पुन्हा मदत देण्यात येणार आहे, अशी माहिती ताडोबा व्याघ प्रकल्पाचे उपवनसंक्षक गुरूप्रसाद यांनी दिली. यावेळी वनपरिश्रेत्र अधिकारी एन. जी. शेंडे, कोलाराचे श्रेत्रसहाय्यक आर.जी. कोडापे, पोलीस निरीक्षक धुळे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष रतिराम वांढरे आदी उपस्थित होते.तीन तासानंतर पोहोचले वन अधिकारीवाघाच्या हल्ल्यात महिला मजूर ठार झाल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळावर प्रचंड गर्दी केली. पोलिसही तात्काळ पोहोचले. मात्र घटनास्थळापासून अवघ्या तीन किमी अतंरावर वनविभागाचे कार्यालय असताना तीन तास उशिरा आल्याने नागरिकांनी नाराजी दर्शविली.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात तेंदूपत्ता महिला मजूर ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:26 PM
तेंदूपत्ता संकलन करीत असताना वाघाच्या हल्ल्यात महिला मजूर ठार झाल्याची घटना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील कक्ष क्रमांक १४३ मध्ये मंगळवारी सकाळी ७. ३० वाजताच्या सुमारास घडली.
ठळक मुद्देताडोबा कोअर झोन क्षेत्रातील घटनानागरिकांमध्ये दहशत