नगरात पाण्याची समस्या : उन्हाळ्यात नागरिकांचे हाल होण्याची शक्यतासिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यात मार्च महिन्यातच तापमानात वाढ झाली आहे. तालुक्यातील नदी-नाले कोरड्या अवस्थेत दिसून येत आहेत. त्यामुळे नगरात नळाद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झालेला दिसून येत आहे. लाखो रुपये खर्च करून सिंदेवाही नगराला पाणी पुरवठा करणारी जुनी नळयोजना कुचकामी ठरली आहे.कधी पाईप लाईन फुटल्याने तर कधी विद्युत मोटार पंप जळल्याने व इतर कारणामुळे नगरवासीयांना नळाचे पाणी मिळत नाही. त्यामुळे नगर पंचायतीने पाण्यासाठी सक्षम नळयोजना अस्तित्वात आणावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून नळाद्वारे अत्यल्प पाणी मिळत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.पाणी पुरवठा करणारी आंबोली नळयोजना १९७४ तर कळमगाव नदीवरील पूरक नळयोजना १९८५ पासून सुरू आहे. सदर नळयोजनेअंतर्गत पोलीस स्टेशनजवळ तीन लाख लिटर तर राम मंदीरजवळ दीड लाख लिटर व दसरा चौकात एक लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या तीन टाक्या आहेत. सन १९७४ मध्ये जेव्हा नळयोजना अस्तित्वात आली, तेव्हा सिंदेवाहीची लोकसंख्या दहा हजार होती. आता येथील लोकसंख्या २५ हजार आहे. सध्या येथे पाच हजार घरगुती नव कनेक्शन आहेत. दरवर्षी नवीन लेआऊटमध्ये नवीन घरे तयार होत आहेत. पूर्वी ग्रामपंचायतीने नळाचे कनेक्शन दिले. त्यामुळे पाणी समस्या येथील नागरिकांना भेडसावीत आहे. याबाबत नगर पंचायत कार्यालयात चौकशी केली असता पाईप लाईन फुटली, विद्युत मोटार पंप जळाले, विहिरीत रेती जमा झाली आदी कारणे सांगितली जातात. पाणी समस्या सोडविण्यकरिता नगर पंचायतीच्या पाणी पुरवठा समितीने पाण्याचे नियोजन करून पाणी समस्येवर उपाय योजना करावे, अशी मागणी होत आहे. उन्हाळा सुरू झाला की, काही नळधारक टिल्लू पंपाद्वारे नळाचे पाणी घेतात तर काही खोल खड्डे तयार करून नळाचे पाणी घेतात. यामुळे सर्वांना पाणी मिळत नाही. नगर पंचायतीने पाणी वितरणाकडे लक्ष न दिल्यास भविष्यात पाणी समस्या निर्माण होणार आहे. पूरक नळयोजनेद्वारे कळमगाव नदीपासून ते सिंदेवाहीपर्यंत दहा किमी सिमेंट पाईपद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. सिमेंट पाईप नेहमी पाण्याच्या प्रवाहाने फुटतात. याचा फटका प्रभाग क्रमांक १५, १६ व १७ ला होतो. येथील लोकसंख्येच्या दृष्टीने अस्तित्वात असलेली पाणी पुरवठा यंत्रणा अयशस्वी ठरत आहे. नगर पंचायत कर्मचाऱ्यांकडून राम मंदीर जवळील पाण्याची टाकी पूर्णपणे भरल्या जात नाही. त्यामुळे काही प्रभागातील घरगुती नळ १५ मिनीटात बंद होतात. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. सखल भागात भरपूर पाणी तर उंच भागात पाणी पुरवठा होत नाही अशी नळयोजनेची अवस्था आहे. आधीच पाणी पुरवठा अत्यल्प, त्यातही टिल्लू पंपधारकाकडे काही प्रमाणात पाणी खेचल्या जाते. त्यामुळे पाणी पुरवठा करणारी नळयोजना अयशस्वी ठरत आहे. कळमगाव नळयोजनेची पाईप लाईन नेहमी फुटत असल्यामुळे संपूर्ण पाणी पुरवठा यंत्रणेवर परिणाम होत आहे. सिमेंट पाईप लाईन बदलवून बीडची पाईप लाईन टाकण्यात यावी, सखल भागात व्हॉल्स बसविण्यात यावे म्हणजे पाणी वाया जाणार नाही. पाण्याची टाकी दुरुस्त करण्यात यावी, प्रशिक्षित विद्युत तंत्रज्ञाची नियुक्ती करावी. विद्युत पंप चालविण्याकरिता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, गावातील संपूर्ण सिमेंट पाईप लाईन जीर्ण झाली आहे. पाईप लाईन बदलविण्यात यावी आदी मागण्या करण्यात येत आहे. यासाठी पालकमंत्री, आमदार, खासदार यांना साकडे घालावे, अशीही मागणी आहे. (पालक प्रतिनिधी)
लाखो रुपयांची सिंदेवाही नळयोजना कुचकामी
By admin | Published: March 05, 2017 12:41 AM