पालकांमध्ये अस्वस्थता : शाखा निहाय प्रवेशाचा समतोल बिघडणार
चंद्रपूर : यंदा कोरोनामुळे शाळा व परीक्षाही झाल्या नाही. अंतर्गत मूल्यांकनानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला. अकरावीच्या प्रवेशासाठी शिक्षण विभागाने सीईटी लागू केली. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून अर्ज सादर करावा लागणार असला तरी तांत्रिक कारणाने अडचणी निर्माण झाल्या. परिणामी, सीईटीसाठी विद्यार्थ्यांची तयारी झाली का, त्यांना शाखा निहाय प्रवेश मिळणार काय याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये शंका आहे.
कोरोनामुळे दहावी परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करावे, याचा तिढा निर्माण झाला होता. राज्य शिक्षण मंडळाने नववीच्या गुणांकावर दहावी परीक्षेचा निकाल लावण्यात आला. निकाल लागल्यानंतर शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी लागू केली. त्यासाठी संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. ही परीक्षा घ्यायची असेल, तर विद्यार्थ्यांसाठी हा प्रकार नवीनच असणार आहे. यामुळे त्यांना किमान दीड महिन्यांचा अवधी, प्रश्नसंच, सराव परीक्षा आदी होणेही आवश्यक आहे. या सर्वांत वेळ खर्च होणार आहे.
प्रवेश प्रक्रिया २ ऑगस्टपर्यंत
राज्य परीक्षा मंडळाच्या ऐच्छिक सीईटी प्रवेशासाठी प्रवेश अर्ज सोमवारी दुपारी ३ वाजतापासून संकेतस्थळावरून ऑनलाईन भरता येणार आहे. ही प्रक्रिया २ ऑगस्टपर्यंत सुरू राहील. मंडळाच्या संकेतस्थळावरूनही सीईटी पोर्टल अॅक्सेस करता येतील, अशी माहिती देण्यात आली. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे हे संकेतस्थळ दुपारी ४ वाजता बंद झाले.
कशी असेल प्रवेश प्रक्रिया ?
राज्यातील अकरावीच्या सीईटीसाठीची नोंदणी ऑनलाइन करावी लागेल. १९ जुलैपासून ही नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. तसेच त्यांना ही परीक्षा द्यायची आहे की नाही एवढेच संकेतस्थळावर जाऊन स्पष्ट करायचे आहे. तर अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यांचे तपशील, गुण भरावे लागतील आणि १७० रुपये परीक्षा शुल्क ऑनलाइन भरावे लागेल.
सीईटीची तयारी कशी कराल?
या प्रवेश परीक्षेसाठी राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील. १०० गुणांच्या या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी दोन तासांचा वेळ दिला जाईल. या परीक्षेतल्या गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाईल. जे विद्यार्थी ही परीक्षा देतील, त्यांना अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर अन्य विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.
-प्रा. विवेक झोडे, करिअर मार्गदर्शक, चंद्रपूर
सीईटी न देणाऱ्यांचे मूल्यमापन दहावीच्या गुणांवर
जे विद्यार्थी ही सीईटी देणार नाहीत, त्यांचे मूल्यमापन दहावीच्या गुणांच्या आधारावर केले जाईल.
प्रवेशाच्या टक्केवारीत मोठी वाढ झाल्याने कला, वाणिज्य, विज्ञान, द्विलक्ष्यी अभ्यासक्रम या शाखांमध्ये उपलब्ध असलेल्या जागा, त्या जागांसाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी यामुळे शाखानिहाय प्रवेशाचा समतोल बिघडण्याची शक्यता आहे. हवे ते महाविद्यालय, हव्या त्या शाखेला प्रवेश मिळेल की नाही, याबाबत शंका आहे.