चंद्रपूर : कार्यकाळ संपण्याच्या एक दिवस अगोदर गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत महापौर राखी कंचर्लावार यांच्या वडगाव प्रभागात १ कोटी ३५ लाखांची कामे मंजूर करून संधी साधली. या ठरावाला काँग्रेससह विरोधी पक्षातील नगरसेवकांनी प्रचंड विरोध केला होता. मात्र, बहुमतापुढे कुणाचे चालले नाही. काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांना अजेंडा फाडून सभागृह सोडवे लागले. दरम्यान, आज महापौर राखी कंचर्लावर यांनी शुक्रवारी शेवटच्या दिवशी दैनंदिन कामकाज पूर्ण करून मनपाचा निरोप घेतला.
चंद्रपूर मनपात गुरुवारी स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांच्या अध्यक्षतेखाली शेवटची सभा झाली. या सभेत १९ कामांना मंजुरी प्रदान केली गेली. त्यातील एक कोटी ३५ लाखांची १५ कामे महापौर राखी कंचर्लावार यांच्या प्रभागातील आहेत. वडगाव प्रभागात निविदा न काढताच एक कोटीची कामे केल्याचा अंतिम चौकशी अहवाल प्रलंबित आहे. निविदेशिवाय एक कोटीच्या कामाचे प्रकरण चर्चेत असतानाच आजच्या स्थायी समितीत एकाच वेळी १५ कामे मंजूर केल्याने काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांनी जोरदार विरोध केला होता. शहरात ६६ नगरसेवक असताना एकाच प्रभागात एवढी कामे कशी काय घेता, इतर प्रभागांच्या नगरसेवकांनी काय करायचे, असा प्रश्न त्यांनी सभागृहात विचारला होता. आज मनपाच्या विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ शुक्रवारी संपला. उद्या शनिवारी आयुक्त राजेश मोहिते हे प्रशासकपदाची सूत्रे हाती घेणार आहेत.
कर्मचाऱ्यांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
चंद्रपूर महानगरपालिकेवर भाजपची एप्रिल २०१७ ते एप्रिल २०२२ या कालावधीत एकछत्री सत्ता होती. त्यामुळे प्रशासकीय कामावरही त्यांनी चांगली पकड ठेवल्याचे या कालावधीत दिसून आले. शुक्रवारी कार्यकाळ संपल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
मनपा निवडणूक लांबणीवर
कालावधीत संपलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर व्हायला विलंब होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतरच चंद्रपूर मनपाची निवडणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तोपर्यंत चंद्रपूर मनपाचा कारभार प्रशासकांच्या हातात राहणार आहे.
एप्रिल २०१७ ते एप्रिल २०२२ या काळात मनपा निधी, नागरी दलित सुधार योजना, नगरोत्थान, पायाभूत सुविधांचा विकास रस्ते बांधकामासाठी निधी दिला. कोनेरी स्टेडियम नूतनीकरण, बाबूपेठ येथील स्टेडियम बांधकाम, महाकाली मंदिर प्रभागात झरपट नदीचे सौंदर्यीकरण झाले. अमृत पाणीपुरवठा, आझाद बगिचासह विविध कामे पूर्ण केली. मनपाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सहकार्य केल्याने हे शक्य होऊ शकले.
-राखी कंचर्लावार, मावळत्या महापौर, चंद्रपूर