लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्वत्र कोरोनाने थैमान घातल्याने संचार बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे आपला बचाव करण्यासाठी घरी जाण्याच्या ओढीने २८ वर्षीय एका युवकाने नागपूर ते सिंदेवाही असा १३० किमीचा उपाशी पोटी पायदळ प्रवास करून गाव गाठले. नरेंद्र विजय शेळके (२८) रा. जाम ता. सावली असे त्या युवकाचे नाव आहे.नरेंद्र पुण्याला काम करण्यासाठी गेला होता. कोरोनाचा प्रादूर्भाव सुरु झाल्यामुळे जमावबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे खासगीकंपन्यांनी काम बंद करून कामगारांना परत पाठवले. कंपनी बंद झाल्यामुळे नरेंद्रने मिळेल त्या वाहनाने नागपूर गाठले. मात्र त्यानंतर संचारबंदी घोषित झाल्याने सर्व ट्रेन व बस बंद करण्यात आल्या. एकीकडे कोरोनाची दहशत आणि गावाला जाण्यासाठी कुठलेच वाहन नाही. त्यामुळे गावाला जायचे कसे, या द्विधा मनस्थितीत नरेंद्र अडकला. त्यानंतर पायदळ गावाला जाण्याचा निर्णय त्याने घेतला आणि चक्क १३० किमीचे अंतर पायदळ गाठले. सिंदेवाहीला आल्यानंतर गस्तिवार असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. त्याने आपली आपबीती सांगितल्यानंतर त्याला प्रहार टॅक्सी चालक संघटनेच्या सदस्यांच्यामार्फत त्याचे मूळ गाव जाम येथे सोडून देण्यात आले.ठाणेदाराने दिला माणुसकीचा परिचयनरेंद्र दोन दिवसापासून उपाशी होता. अत्यंत कमजोर अवस्थेत तो सिंदेवाही पोलिसांना आढळून आला. ठाणेदार निशिकांत रामटेके यांनी त्याला सॅनिटायझर देऊन हात धुण्यास सांगत आस्थेने विचारपूस केली. यावेळी त्याने परिस्थिती कथन केली. आपण दोन दिवसापासून उपाशी असल्याचेही त्याने सांगितले. तेव्हा पोलीस उपनिरीक्षक गोपीचंद नेरकर यांनी स्वत:च्या घरून डबा आणून त्याला जेवण दिले. त्यानंतर हातावर होम कोरोनटाइन असा शिक्का मारून सिंदेवाही येथील प्रहार टॅक्सी चालक संघटनेच्यामार्फत त्याला बुधवारी रात्री सावली तालुक्यातील जाम येथे सोडण्यात आले.