जिल्ह्यात मंगळवारपर्यंत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १२ हजार ६८४ झाली. १ हजार ६७६ चाचण्यांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रात ६९१, तर ग्रामीण भागात ४३२ असे एकूण ६९१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. रुग्णांची घसरलेली संख्या कमी चाचण्यांमुळे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्यांमध्ये शहरी भागातून ४४ हजार ५१२, तर ग्रामीण भागात २७ हजार ९०७ नागरिक पॉझिटिव्ह आढळल्याची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७२ हजार ४१९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. पॉझिटिव्हमध्ये शहरी भाग ६१.४६ टक्के तर ग्रामीण भागात ३८.५४ टक्के आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने ग्रामीण भागात जनजागृतीचे विविध उपक्रम राबविले. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेला ग्रामीण भागातील नागरिकांकडूनच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला; परंतु महानगरपालिका, नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांनी या मोहिमेकडे दुर्लक्ष केले आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काय?
१ ग्रामीण व शहरी भागात २ लाख ४४ हजार ८२१ आणि चंद्रपूर मनपा क्षेत्रात १ लाख ४९ हजार ३२० नागरिक हायरिस्क गटात येतात. अशा नागरिकांची एकूण संख्या ४ लाख ४१ हजार ४१ एवढी आहे; परंतु कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण चंद्रपूर मनपा क्षेत्रात अधिक (१७.३१) तर ग्रामीण भागात (१०.४७) कमी आहे.
२ दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाची बाधा होत आहे. लोकसंख्येचा तुलनात्मक विचार केल्यास बाधितांचे प्रमाण कमी आहे; परंतु लक्षणे नसणाऱ्या पॉझिटिव्हची संख्या आता वाढत आहे. उपचार करण्यास विलंब होत असल्याने मृतांची संख्या वाढू लागल्याचे दिसून येत आहे.
३ कोरोना संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात विलगीकरण कक्षाचा अभाव होता. आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य असणाऱ्या कुटुंबातील सदस्य एकाच घरात कसेबसे राहतात. अशा वेळी पॉझिटिव्ह आढळल्यास इतरांनाही संसर्गाचा धोका होता; पण दुसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायतींना निधी मिळाल्याने गावातच विलगीकरण कक्ष तयार करणे सोपे झाले.
४ सध्या खरीपपूर्व हंगामाची कामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना बियाणे व खत खरेदीसाठी तालुकास्थळी जावे लागते. या संपर्कामुळे कोरोना संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाने खरिपाचे बियाणे व खते गावातच पुरविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
लसींवर शहरी नागरिकांचा डल्ला
लसीकरण सुरू झाल्यानंतर शहरी भागातील नागरिकांनीच ऑनलाइन नोंदणी ग्रामीण नागरिकांच्या हक्काच्या लसीवर डल्ला मारला. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे लसीचा साठा उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील १०० पेक्षा जास्त लसीकरण केंद्र बंद आहेत. नागरिकांचे लसीकरण थांबले. टेस्टिंगची संख्या घटविली. आरोग्य तज्ज्ञ व सरकारकडून तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला आहे. अशा स्थितीत ही लाट कशी रोखणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
ऑनलाइन नोंदणी त्रासदायक
लसीकरणासाठी नागरिकांची अडचण होऊ नये, यासाठी केंद्रांची संख्या वाढविली; पण जिल्ह्याला पुरेसे डोस मिळत नाही. १८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाइन नोंदणी सक्तीची करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना अशी नोंदणी करणे शक्य नाही. शहरी नागरिक याचाच गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करू नये, अशी मागणी नागरिकांनी केली.