परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीला मागील वर्षीपासून हिरवी झेंडी मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. दरम्यान, शिक्षक पात्रता परीक्षेचीही जाहिरात प्रसिद्ध झाल्याने विद्यार्थ्यांनी उत्साहाने अर्ज भरले. मात्र एसटी महामंडळाच्या संपामुळे अनेक विद्यार्थी वेळेच्या आत परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाही. त्यातच काही केंद्रांनी परीक्षार्थ्यांचे काहीच ऐकून न घेता वेळेपूर्वीच महाविद्यालयाचे गेटच कुलूपबंद केल्याने परीक्षा न देताच अनेकांना परतावे लागले. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण सेवक म्हणून रुजू होण्याकरिता शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक केले आहे. यंदाची शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी जिल्ह्यातील १५ केंद्रांवर घेण्यात आली. प्राथमिक शिक्षक पात्रता परीक्षेकरिता १५ केंद्रांवरून चार हजार ४९० परीक्षार्थी तर उच्च प्राथमिक शिक्षक पात्रता परीक्षेकरिता १४ केंद्रावरून ३ हजार ९७५ परीक्षार्थ्यांचे नियोजन करण्यात आले होते. परीक्षा केंद्रावर ३० मिनिटांपूर्वी हजर राहावे, अशी सूचना होती. तर २० मिनिटांपूर्वी परीक्षा हॉलमध्ये बसविण्यात येणार होते. परंतु, एसटी महामंडळाचा संप असल्याने काही परीक्षार्थी १० वाजून ५ ते १० मिनिटांनी डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर पोहोचले. परंतु, या केंद्राचे गेट पेपर १०.३० वाजताचा असताना १० वाजताच बंद झाले. परिणामी परीक्षेच्या २० मिनिटांपूर्वी परीक्षा केंद्रावर पोहचूनही अनेक परीक्षार्थ्यांना या परीक्षा केंद्रावरून परीक्षा न देताच परत जावे लागले. याउलट इतर परीक्षा केंद्रावर १०.३० वाजता गेलेल्या परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रात येऊन परीक्षा देण्याची मुभा दिली. परीक्षा केंद्रावर झालेल्या दुजाभावामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
परीक्षार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर ३० मिनिटांपूर्वी उपस्थित राहण्याची सूचना नमूद आहे. त्यामुळे परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर वेळेवर येणे अपेक्षित होते. मात्र अनेक विद्यार्थ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले नाही. - दीपेंद्र लोखंडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, चंद्रपूर
एटापल्लीवरून आले हो सर...- परीक्षेला जायचे आहे म्हणून सकाळी ४ वाजता उठून मिळेल त्या साधनाने चंद्रपूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र गाठले. परीक्षेच्या २० मिनिटांपूर्वी केंद्रावर पोहचले. परंतु, महाविद्यालयाने गेटच बंद केले. तीन वर्षांपासून परीक्षा झाली नाही. आता ही पण संधी गेली. सर, खूप दुरून आले, परीक्षेला वेळही आहे. त्यामुळे आता जाऊ द्या, किमान परीक्षा प्रमुखांना भेटू द्या, अशी गयावया एका विद्यार्थिनीने केली. मात्र तेथील कर्मचाऱ्यांना साधा गेट उघडण्याची तसदीही घेतली नाही.
केवळ याच केंद्रावर नियम का?- अनेक परीक्षार्थी भाड्याने एकत्रित गाडी करून चंद्रपूरला आले होते. एटापल्ली येथील काही मित्र-मैत्रिणीसुद्धा एकत्रच आले. एका मैत्रिणीला आंबेडकर कॉलेजच्या गेटवर सोडून ते सेंट मायकलच्या परीक्षा केंद्रावर गेले. तरीसुद्धा सेंट मायकलच्या परीक्षार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. परंतु, डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला नाही, असा भेदभाव का करण्यात आला, असा प्रश्न अनेक परीक्षार्थ्यांना पडला आहे.