चंद्रपूर : कोरोना महामारीत शाळा पूर्णतः बंद होती. केवळ ऑनलाईन वर्ग सुरु होते. परंतु, शहरातील नारायणा विद्यालय व्यवस्थापनाने वर्षाला १५ टक्के शुल्कवाढ केली. त्यामुळे शुल्कवाढ विरोधात पालकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर थाळी वाजवा आंदोलन केले. जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांना घेराव घालून शाळा व्यवस्थापनावर कार्यवाही करण्याची मागणी रेटून धरली.
कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. केवळ ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. असे असतानाही शाळा व्यवस्थापनाने पूर्ण शुल्क वसूल करण्याचा तगादा लावला आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना शुल्क भरणा केला नाही, पाल्यांना शाळेत दाखल असल्याचा दाखला, त्यांचे आभासी वर्ग व शाळा सोडल्याचा दाखलाही देणे बंद केले आहे, असा आरोपही पालकांनी उल्हास नरड यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. मागण्यांची पूर्तता न केल्यास यापुढे तीव्र आंदोलन करू, असा इशारा पालकांनी दिला. यावेळी नरड यांनी उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात पुरूषोत्तम आवळे, वैशाली टोंगे, भूषण बंडावार, सचिन महाजन यांच्यासह अन्य पालक सहभागी झाले होते.