मासळ (बु.) : राष्ट्रीय उद्यान ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत मासळ परिसर वसलेला असून देश-विदेशातील पर्यटक येत असतात. मात्र अनेक गावांतील स्वच्छतेचा बोजवारा वाजला आहे. परिसरात डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले असून या आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
मासळ परिसरातील अनेक गावांलगत खड्डे असून त्यात सांडपाणी साचत असते. त्यातच गावातील नाल्यांचे सांडपाणी वाहते. प्रवाह नसल्याने नालीत सांडपाणी साचलेले आहे. त्यामुळे अनेक गावांत सांडपाण्याचे डबके तयार झाल्याने ते डबके रोगराईला निमंत्रण देत आहे. डेंग्यूसदृश आजाराचे थैमान झाल्याने तालुक्यातील खासगी दवाखान्यात मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत आहे. वातावरण बदल, गावातील अस्वच्छता यामुळे परिसरातील डेंग्यूसदृश रुग्ण वाढत आहेत.
बॉक्स
फवारणी करण्याची मागणी
परिसरातील अनेक गावागावांत ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य वाढल्याने गावालगत सांडपाण्याचे डबके तयार झाले. त्यामुळे मच्छरचे प्रमाण अधिक वाढल्याने प्रशासनाने गावागावात फवारणी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.