चंद्रपूर : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध छेडल्यामुळे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील १२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दोन विद्यार्थी घरी पोहोचले असून, अन्य विद्यार्थी अद्याप तिथेच आहेत. बुधवारी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप आणण्यासाठी युक्रेनमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यामध्ये महाराष्ट्रातील असल्याचे म्हणताच, मंत्री सिंधिया यांनी मराठीत बोलायला लावलेला महेश भोयर हा चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील रहिवासी आहे. ही बाब महेशच्या पालकांना कळताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
भारतातून मोठ्या संख्येने विद्यार्थी एमबीबीएस शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेले आहेत. या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. विद्यार्थ्यांना मोल्दोव्हा आणि बुखारेस्टमार्गे भारतात आणले जाणार आहे. दरम्यान, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याठिकाणी जाऊन भारतातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मराठीमध्ये बोललेला विद्यार्थी चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील महेश भोयर हा आहे. महेशचे वडील कोरपना येथे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत. महेश सहा महिन्यांपूर्वीच वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेला आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी मराठीत बोल असे म्हटल्यानंतर महेशला आपल्या जवळचा माणूस नेण्यासाठी आल्याचा अत्यानंद झाल्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. त्याने लगेलच मंत्री सिंधिया यांना आपण महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले. यावेळी सिंधिया यांनी त्याला सुखरूप गावी पोहोचविण्याचे आश्वासन दिले. एवढेच नाही तर कुटुंबीयांसोबत संवाद साधून सुखरूप असल्याचे सांगशील, असेही शिंदे यांनी महेशला सांगितले.