चंद्रपूर : चंद्रपूरकरांना ‘स्वच्छ चंद्रपूर आणि सुंदर चंद्रपूर’चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या सत्तारूढ काँग्रेसचे शहराच्या विकासाकडे पाहिजे तसे लक्ष नाही. प्रशासनाचे तर केवळ दुर्लक्षच होत आहे. शहरात सध्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील नाल्या, गटारी ठिकठिकाणी कचरा, प्लास्टिकने तुंबल्या असून रस्त्यावरही घणकचर्याचे ढिगारेच बघायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी मनपाने गटारांची थातूरमातूर स्वच्छता करीत केवळ देखावा केला. अडीच वर्षापूर्वी चंद्रपूर नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर चंद्रपूरकरांनी शहराच्या विकासाचे स्वप्न पाहणे सुरू केले. मनपा अस्तित्वात आल्यानंतर सहा महिन्यानंतर मनपासाठी पहिली निवडणूक झाली. यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी चंद्रपूरकरांना विकासाचे गाजर दाखवून मताचा जोगवा मागितला. काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकत शिवसेनेच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली. मात्र, विकासाच्या दृष्टीने विचार केल्यास मागील दोन वर्षात सत्तारूढ काँग्रेस-शिवसेनेने चंद्रपूरकरांचा भ्रमनिरास केला आहे. सुरूवातीच्या काळात रस्त्याच्या समस्येने चंद्रपूरकर चांगलेच हैराण झाले होते. आधीच खराब असलेले रस्ते, भूमिगत गटार योजनेमुळे आणखीच खराब झाले. रस्त्यामुळे चंद्रपूरकरांची सर्वत्र ओरड सुरू होताच दीड वर्षानंतर रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली. मात्र, अजूनही शहरातील अनेक रस्त्यांची कामे शिल्लक असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यातच शहरातील नाल्या, गटारीची भर पडत असून त्या ठिकठिकाणी तुंबल्याचे चित्र बघायला मिळत आहे. एक महिन्यावर पावसाळा आला असताना मनपाने गटारे, नाल्या उपसण्याचे काम सुरू केले खरे; मात्र अगदी थातूरमातूर ही स्वच्छता दिसून येत आहे. ज्या ठिकाणाहून मोठे गटारे गेले आहेत. तिथे अनेकांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. त्यामुळे तिथे गाळ उपसलाच जाऊ शकत नाही. प्रत्येक वॉर्डात नाल्या, गटारी तुंबल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. मोठी गटारे प्लास्टिक, कचर्याने तुंबले आहेत. पर्यायाने सांडपाणीच वाहून जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. मात्र, मनपाला, याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने अस्वच्छतेकडे किमान नगरसेवक, पदाधिकारी तरी लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गंजवॉर्डात अस्वच्छतेची समस्या गंभीर असून नाल्यांची मागील अनेक महिन्यांपासून साफसफाई झाली नसल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. आंबेडकर पुतळ्यापासून तर बिनबा गेटकडे जाणार्या मार्गावर हॉटेल मीडटॉऊनजवळ असलेल्या मोठ्या नाल्यामध्ये कचर्याचे मोठे ढिगारेच बघायला मिळतात. नाल्याच्या चोकअपमुळे मागील काही वर्षांपासून मोठा पाऊस पडला की शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होत आहे. आझाद बाग, गिरनार चौक येथे दरवर्षीच अशी परिस्थिती बघायला मिळते. शहरातही काही ठिकाणी अशीच स्थिती असून याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)
गटारे, नाल्यांची थातूरमातूर स्वच्छता
By admin | Published: May 11, 2014 11:26 PM