ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : झाडीपट्टी रंगभूमीच्या अनेक समस्यांवर आणि सामर्थ्यस्थळांवर सखोल विचार मंथन करून दहा ठराव परित केल्यानंतर चौथ्या झाडीपट्टी नाट्य संमेलनाचा समारोप झाला. यावेळी माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार, संमेलनाध्यक्ष अनिरुद्ध वनकर, न. प. उपाध्यक्ष अशोक रामटेके, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जि.प. सदस्य प्रमोद चिमूरकर, माजी संमेलनाध्यक्ष परशुराम खुणे, शेखर डोंगरे, डॉ. मंगेश बन्सोड, अब्दुल गणी, युवराज प्रधान, प्रा. सदानंद बोरकर उपस्थित होते.
झाडीपट्टी नाट्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी गीत गायन, लावण्या सादर करण्यात आल्या. झाडीपट्टीतील महिलांसमोरील आव्हाने या विषयावर परिसंवाद पार पडला. सायंकाळी ७ वाजता समारोपीय कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. संमेलनाध्यक्ष अनिरुद्ध वनकर म्हणाले, काळानुसार नाटकातील पात्र, पटकथा, दृश्य यात बदल करण्याची आवश्यकता आहे. येत्या काळात झाडीपट्टीची ओळख महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात व जगात व्हावी यादृष्टीने बदल करण्याची गरज आहे. माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी झाडीपट्टी रंगभूमीच्या मौलिकतेचे कौतुक करून मदतीचे आश्वासन दिले.
असे आहेत ठराव
झाडीपट्टी रंगभूमीला राजाश्रय देण्यात यावा, वडसा हे झाडीपट्टी रंगभूमीचे प्रमुख केंद्र असून तिथे नाट्यगृह निर्माण करण्यात यावे, झाडीपट्टी रंगभूमीतील कलावंतांना मानधन द्यावे, प्रशिक्षण केंद्र उभारून येणाऱ्या पिढीला प्रशिक्षण द्यावे. संमेलनाला आर्थिक योगदान देण्यात योजना आखावी, झाडीपट्टी रंगभूमी कलाकारांना राज्य पुरस्कार द्यावे, झाडीपट्टीसाठी वस्तू संग्रहालय निर्मिती करावी. या रंगभूमीच्या नाट्यसंहिता प्रकाशनासाठी शासनाने अनुदान द्यावे, झाडीपट्टी रंगभूमीचा इतिहास जतनासाठी ग्रंथनिर्मिती करावी, शासकीय प्रसारमाध्यमांनी या रंगभूमी उपक्रमाची दखल घेऊ जनसामान्यांपर्यंत पोहोचवावी, आदी दहा ठराव संमेलनात पारित करण्यात आले.