चंद्रपूर - ब्रह्मपुरी तालुक्यात दहशत माजवणाऱ्या वाघाला अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. जून महिन्यापासून या भागात वाघाने केलेल्या तीन मोठ्या हल्ल्यात ग्रामस्थांचा मृत्यू झाला होता. खरीप पिकांच्या पेरणी व देखभालीसाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना वाघाने लक्ष्य केले होते. त्यामुळेच नागरिकांमधील संताप लक्षात घेता मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांनी या वाघाला पिंजराबंद करण्याचे दिले. त्यानंतर, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीच्या जंगलात वावरणाऱ्या या हल्लेखोर नर वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आहे.
टी-103 असे या नरभक्षक वाघाचे नाव असून जून महिन्यापासून तीन मोठ्या हल्ल्यात त्याने गावकऱ्यांचा जीव घेतला होता. त्यामुळेच, नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळल्यानंतर वन विभागानेही तातडीने दखल घेत वाघाला जेरबंद करण्याची कारवाई सुरु केली. मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांनी 17 ऑगस्ट रोजी या वाघाला पिंजराबंद करण्याचे आदेश दिले. आज सकाळी ब्रह्मपुरी उपक्षेत्रातील जंगलातल्या भगवानपुर येथील कक्ष क्रमांक 890 मध्ये हा वाघ फिरताना आढळला होता.
वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रविकांत खोब्रागडे व सशस्त्र पोलीस कर्मचारी अजय मराठे यांनी नेमका डार्ट मारुन अडीच वर्षाच्या नर वाघाला बेशुद्ध केले. या वाघाची वैद्यकीय तपासणी करुन त्याला चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रुषा केंद्रात हलविले जाणार आहे. वाघ जेरबंद झाल्यानंतर ब्रह्मपुरी शहरालगतच्या शेतशिवारात नागरिक आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. मात्र, वाघाच्या गेल्या काळात घातलेल्या गोंधळाच्या आठवणी अनेकांसाठी दु:खद आणि थरारक आहेत.