चंद्रपूर : हिमाचल प्रदेशात नोंदणी असलेली, तसेच नंबरप्लेटही न लावता धावणारी ऑडी चक्क चंद्रपुरातील रस्त्यांवर धावत होती. परराज्यांतील वाहन इतर राज्यात कायमस्वरुपी रस्त्यावर धावत असेल तर त्यांना वाहन टॅक्स भरणे गरजेचे असते. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी त्या चालकाला वाहनासंदर्भातील कागदपत्रे मागितली. मात्र, त्यांनी ती सादर केली नसल्याने ती ऑडी जप्त करण्यात आली. त्या ऑडीची मूळ किंमत पावणेतीन कोटी असून सॅट्स एनर्जी ॲण्ड स्टील प्रायव्हेट लिमिटेड यांच्या नावाने नोंदणी असल्याची माहिती आहे. या कारवाईने शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होण्याची शक्यता आहे.
कुठल्याही परराज्यांतील वाहने इतर राज्यांत कायमस्वरुपी धावत असतील तर त्यांना तेथील टॅक्स भरून त्या राज्यात नोंदणी करणे गरजेचे असते. परंतु, सॅट्स एनर्जी ॲण्ड स्टील प्रायव्हेट लिमिटेड नावाने हिमाचल प्रदेशात एचपी १२ एम ०८८० क्रमांकाने नोंदणी असलेली ऑडी चंद्रपुरात विना नंबरप्लेट धावत होती. आरटीओ किरण मोरे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी ती ऑडी जप्त केली आहे. शहरात धावणाऱ्या इतरही वाहनांची अशीच तपासणी करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात धावचेय तर भरावे लागणार २० लाख
त्या ऑडीला महाराष्ट्रात कायमस्वरुपी धावायचे असेल तर महाराष्ट्रात नोंदणी करून टॅक्स भरावे लागणार आहे. किमान २० लाख रुपये टॅक्स त्या वाहनमालकाला भरावे लागणार आहे.
परराज्यातील हायटेक वाहने जर महाराष्ट्रात धावत असतील तर त्यांना आपल्या राज्यात नोंदणी केल्यानंतरच ते रस्त्यावर धाऊ शकतात. परंतु, या गाडीला कुठलाही नंबरप्लेट नव्हता तसेच नोंदणीही हिमाचल प्रदेशात होती. महसुल बुडत असल्याने ती ऑडी जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर सुचनापत्रक देऊन व १७ हजार ५०० रुपयांचा दंड देऊन वाहनाला नंबर प्लेट लावून ती गाडी सोडण्यात आली.-किरण मोरे, आरटीओ, चंद्रपूर
बॉक्सअनेकांनी काढली सेल्फी
आरटीओ कार्यालयात विविध कामासाठी नागरिक येत असतात. आरटीओ कार्यालयासमोर ती गाडी दिसताच अनेकांनी त्या ऑडीसोबत सेल्फी काढली. सेल्फीसाठी मोठी झुंबड उडाली होती.