वढोली (चंद्रपूर) : गोंडपिपरी येथे भाड्याच्या घरात राहणारे तलाठी ओमकार भदाडे (२६) हे शनिवारी (दि.२६) दुपारी १ वाजेच्या सुमारास मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. भदाडे हे पोंभुर्णा तालुक्यातील देशपांडे (पिपरी) येथे कार्यरत होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील रहिवासी ओमकार भदाडे हे सकाळी मित्रांसोबत व्यामशाळेत जाऊन परत आल्यावर धाबा पॉईंट चौक येथील बालू चिंतावार यांच्या भाड्याच्या खोलीत गेले. दरम्यान, शेजारच्या व्यक्तीने जेवायला आवाज दिला. मात्र प्रतिसाद न मिळाला नाही. त्यामुळे पोलिस व मित्रांच्या सहकार्याने खोलीचा दरवाजा तोडून बघितले असता ते मृतावस्थेत आढळले.
तीन दिवसांपासून त्यांच्या छातीत दुखत असल्याचे तलाठी सुरज राठोड यांना सांगितले होते. उपचारासाठी आग्रहही केला. त्यांनी दुर्लक्ष केल्याची चर्चा असल्याने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल्, अशी माहिती ठाणेदार जीवन राजगुरू यांनी दिली. युवा तलाठी ओमकार भदाडे यांच्या अकाली मृत्यूने महसूल प्रशासनातर्फे हळहळ व्यक्त होत आहे.