चंद्रपूर : शहरात व्हिडीओ गेम पार्लरच्या नावाखाली जुगाराचा डाव सुरू असल्याची बाब 'लोकमत'ने प्रकाशित करताच रामगनर पोलिसांनी बुधवारी राजवीर व्हिडीओ पार्लरवर धाड टाकली. या कारवाईने अवैधरीत्या व्हिडीओ गेम पार्लर चालविणाऱ्या सट्टेबाजांचे धाबे दणाणले असतानाच आता जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दखल घेऊन व्हिडीओ गेम पार्लरचा गेम करण्यासाठी तहसीलदार व ठाणेदारांची पथके गठित करण्याचा आदेश जारी केला.
मनोरंजनाच्या नावाखाली प्रशासनाची परवानगी न घेता चंद्रपुरात व जिल्हाभरात सर्रास जुगार सुरू आहे. त्यामुळे युवापिढी या जुगाराच्या नादी लागली. अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. शाळेकरी मुलेही याला बळी लागली. 'लोकमत'ने लक्षवेधी वृत्त प्रसिद्ध करताच पोलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार पोलिस उपनिरीक्षक दीपेश ठाकरे यांच्या नेतृत्त्वात रामनगर पोलिसांनी सपना टाॅकीज चौकातील राजवीर व्हिडीओ पार्लरवर धाड टाकून आरोपी विनोद संकत याला मुद्देमालासह अटक केली. जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर विनापरवाना व्हिडीओ गेम पार्लरमध्ये जुगार खेळला जातो, याची कुणकुण जिल्हाधिकारी विनय गौडा यांना लागली. त्यांनी या व्हिडीओ गेम पार्लरची चौकशी करण्यासाठी सर्व तहसीलदार व ठाणेदारांची हद्दनिहाय पथके गठित करण्याचा आदेश दिला आहे.
अशी होणार चौकशी
परवान्याच्या जागेत बदल झाला आहे काय,परवान्यात नमुद वेळ पाळली जाते काय, परवान्यात दर्शविलेल्या संख्येइतकेच मशीन परवानास्थळी आहेत किंवा कसे, परवानास्थळी काही इतर अवैध व्यवसाय चालतात काय, याव्यक्तीरिक्त परवान्यातील अटी व शर्तींचे होते की कसे याची चौकशी संबंधित तहसीलदार व ठाणेदारांचे पथक चौकशी करणार आहे. चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.