चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र पर्यटनासाठी ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या चंद्रपूर वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन या कंपनीने ताडोबा फाउंडेशनची १२ कोटी १५ लाख ५० हजारांनी फसवणूक केली. कंपनीचे संचालक अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर या दोघांनी चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने मंगळवारी (दि. २९) फेटाळला आहे.
ताडोबा पर्यटनासाठी चंद्रपूर वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन आणि ताडोबा अंधारी टायगर प्रोजेक्ट प्रमोशन फाउंडेशनचे कार्यकारी संचालक यांच्यासोबत यांच्यात करार झाला होता. ही कंपनी अभिषेक आणि रोहित ठाकूर या दोन सख्ख्या भावंडांची आहे. करारानुसार, ही कंपनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कमिशनच्या आधारावर ऑनलाइन पर्यटन बुकिंग करू शकते. २०२० ते २०२३ या कालावधीत या कंपनीला केलेल्या बुकिंगअंतर्गत २२ कोटी २० लाख एवढी रक्कम ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रमोशन फाउंडेशनकडे जमा करायची होती. कंपनीने केवळ १०.६५ कोटी जमा केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. कंपनीने ताडोबा व्यवस्थापनाला १२ कोटी १५ लाख ५० हजारांनी गंडा घातला.
चार वर्षांच्या लेखापरीक्षणानंतर ही बाब समोर आली. सरकारी पैशांची उधळपट्टी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वनविभागाने विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांनी दोन्ही कंपन्यांविरुद्ध रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अभिषेक आणि रोहित ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच अभिषेक व रोहित ठाकूर या दोघांनी चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला. त्यामुळे आता या दोन्ही भावंडांना नागपूर उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घ्यावी लागणार किंवा आर्थिक गुन्हे शाखेसमोर शरणागती पत्करावी लागणार आहे.