चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील वाळूघाट चालकाला एका डॉक्टरने सात लाख रुपयांची खंडणी मागून यातील ३२ हजार आरटीजीएस करण्याची मागणी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात वाळूघाट चालक शुभम चांभारे यांनी वरोरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देताच डॉ. नरेंद्र दाते याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२९ वर्षीय शुभम चांभारे मागील ४ ते ५ वर्षांपासून रेतीचा व्यवसाय करतात. दरम्यान, भद्रावती येथील डॉ. नरेंद्र दाते यांनी चांभारे यांच्या राळेगाव रिट भद्रावती येथील वाळूघाटावर जात त्या ठिकाणचे फोटो काढून व्यवस्थापक आशुतोष घाटे याला धमकाविण्याचा प्रकार महिनाभरापासून सुरू होता. एवढेच नाही तर वाळूघाटावर जात चांभारे यांना पैशांसाठी त्रास देत होता. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी व तहसीलदार यांच्यासोबत आपले चांगले संबंध असल्याची माहिती दाते हा इतरांकडून चांभारे यांना देत होता. कारवाई टाळायची असेल तर सर्व अधिकाऱ्यांना सांभाळण्यासाठी ७ लाख रुपयांची खंडणी चांभारे यांना मागितली होती.
९ जूनला दुपारी १२ वाजताच्या सुमारास डॉ. दाते यांनी सुपरवायझर घाटे याला फोन करीत मी जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांना सांभाळतो. त्याकरिता ३२ हजार रुपये आरटीजीएस किंवा फोन पेद्वारे ट्रान्सफर करा, अशी मागणी केली. हे सर्व संभाषण चांभारे यांनी आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केले. त्यानंतर चांभारे यांनी या प्रकरणाची तक्रार वरोरा पोलिस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी कलम ३८५ अनव्ये डॉ. नरेंद्र दाते यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे