परिमल डोहणे लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच निवडणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी परवानाधारक शस्त्रे जमा करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले आहेत. आदेश धडकताच जिल्ह्यातील ५४२ पैकी ३९० शस्त्रे संबंधित पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. शिल्लक १५२ शस्त्रे जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. पोलिस ठाण्यात जमा करण्यात येणारी ही अग्निशस्त्रे आचारसंहिता संपल्यानंतर परत देण्यात येणार आहेत.
राजकारणी असो की मोठे व्यावसायिक याशिवाय विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी यांच्याकडून स्वरक्षणासाठी शस्त्र परवाना काढला जातो. हा शस्त्र परवाना जिल्हा प्रशासन व पोलिस अधीक्षक यांच्यामार्फत गृहविभागाच्या परवानगीने दिले जातात.
चंद्रपूर जिल्ह्यात ५४२ जणांनी शस्त्र परवाने घेतले आहेत. सध्या विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जाहीर झाली आहे. निवडणूक काळात राजकीय वाद-विवाद, वैमनस्य उफाळून येण्याची शक्यता असते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्या संयुक्त समितीने पिस्तूल, रायफल व इतर अग्निशस्त्र जमा करून घेण्याचे निर्देश सर्व ठाणेदारांना दिले आहेत. प्रामुख्याने निवडणूक काळातील दंगलीत थेट सहभागी, गुन्हे दाखल झालेले या वर्गवारीतील तसेच परवानाधारकांची अग्निशस्त्रे जमा करून घेण्यात येणार आहे. तसेच त्यांचे पोलिस रेकॉर्डदेखील पाहण्यात येणार आहे. बँक व वित्तीय संस्थांत कार्यरत सुरक्षारक्षक यांची अग्निशस्त्रे जमा करण्यात येणार नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. आजपर्यंत ५४२ पैकी ३९० जणांनी संबंधित ठाण्यात शस्त्र जमा केले आहेत.
तर घ्यावी लागेल परवानगी जिल्ह्यात ५४२ जणांनी आत्मसंरक्षणार्थ शस्त्रांचा परवाना १. घेतला आहे. ज्या व्यक्तींना स्वसंरक्षणासाठी जवळ शस्त्र बाळगण्याशिवाय पर्यायच नाही, अशा व्यक्तींना शस्त्र ठेवण्याची मुभा दिली जाते. त्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या छाननी समितीपुढे अर्ज करून याबाबत सबळ पुरावे द्यावे लागणार आहेत. २. समितीच्या वतीने तपासणी केल्यानंतर त्यांना शस्त्र • बाळगण्याची परवानगी देण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस चार जणांनी अशी परवानगी मागितली होती.
"निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने शस्त्र जमा करण्यात येत आहेत. यासंदर्भात प्रत्येक ठाणेदारांना सूचना दिल्या असून, दररोज आढावा घेणे सुरू आहे. सद्यः स्थितीत ३९० च्या जवळपास शस्त्र जमा करण्यात आली आहेत. ज्यांना आत्मसंरक्षणासाठी शस्त्र ठेवायचे आहे, त्यांना पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांच्या गठित समितीकडे अर्ज सादर करावा लागणार आहे. त्यानंतर ती समिती निर्णय घेऊन परवानगी देणार आहे."- मुम्मका सुदर्शन, पोलिस अधीक्षक, चंद्रपूर