बाबूराव बोंडे
तोहोगाव (चंद्रपूर) : वर्धा नदीच्या पाण्यात बुडून मरण पावलेल्या मुलांवर सामूहिक अंत्यविधी नलफळी घाटावर करण्यात आला. या अंत्यविधीसाठी संपूर्ण गावकरी उपस्थित होते. सोबतच कोठारीचे ठाणेदार विकास गायकवाड, संवर्ग विकास अधिकारी शालिक माउलीकर, तोहोगाव शाळेतील संपूर्ण शिक्षक व इतर शासकीय कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली होती. यावेळी सर्वच उपस्थित नागरिकांचे डोळे पाणावले होते.
शवविच्छेदन करून मृतदेह गावात येताच पाहण्यासाठी संपूर्ण गाव एकवटले. कुटुंब, नातेवाइकांनी तर हंबरडाच फोडला. यावेळी उपस्थित गावकऱ्यांचेही अश्रू अनावर झाले होते. तोहोगावपासून दोन किमी अंतरावर असलेल्या वर्धा नदीच्या सिंधी घाटावर, तोहोगावच्या जिल्हा परिषद शाळेत शिकणारे चार विद्यार्थी शनिवारी सकाळची शाळा आटोपून खेकडे पकडण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न समजल्याने ते वर्धा नदीच्या प्रवाहात वाहून गेले होते. यातच त्यांचा मृत्यू झाला.
अन् त्या पोलिसांनी घेतली होती नदीत उडी
पोलिस हा जनतेचा सेवक आणि मित्र असल्याचे विधान प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये दर्शनी भागातील फलकावर असले तरी या विधानाला प्रत्यक्षात साकारण्याचे काम कोठारी पोलिस ठाण्याच्या दोन पोलिसांनी करून दाखविले. राजू राजूरकर व सचिन पोहणकर अशी त्यांची नावे आहेत. दुथडी भरून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या सिंधी घाटावर तीन शाळकरी विद्यार्थी बुडाल्याची माहिती कोठारीचे ठाणेदार विकास गायकवाड यांना प्राप्त होताच ते पोलिस सहकाऱ्यांसह सिंधी घाटावर पोहोचले. तहसीलदार व आपत्कालीन शोध चमूंना माहिती दिली. मात्र, चंद्रपूरवरून शोध पथक येण्यास विलंब लागत होता. सोबत नावही नव्हती. मात्र, मुलांना शोधण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता दुथडी भरलेल्या नदीत राजू राजूरकर व सचिन पोहणकर या पोलिसांनी थेट उडी घेतली. तब्बल अर्धा किलोमीटरचा परिसर पिंजून काढला.