लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सतत पाच दिवसांपासून पाऊस धो-धो बरसत असल्याने नदी-नाल्यांना पूर आला. पावसाच्या माऱ्याने अनेकांची पडझड झाली तर शेकडो एकर शेती पुराच्या पाण्याखाली आली. गावांत पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. जिवती ते वणी, जिवती-येल्लापूर मार्गावरील शाळाच भरल्या नाहीत. नाल्याला पूर आल्याने वरोरा, बल्लारपूर, मूल, सावली, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, चिमूर, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना तालुक्यांतील अनेक रस्ते बंद झाले. मंगळवारी दिवसभर संततधार सुरू असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तीन लाखांचे डेकोरेशनचे साहित्य पाण्यातमूल : शहरातील श्रमिक नगरातील शुभम अशोक पोलोजवार या युवकाच्या घरात पाणी शिरल्याने डेकोरेशनचे इलेक्ट्रिक साहित्य खराब होऊन सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले. बेरोजगारीवर मात करण्यासाठी या युवकाने बँकेतून कर्ज काढून स्वत:चा व्यवसाय सुरू केला होता. शहरातील सर्वच वस्त्या जलमय झाल्या असून, काही घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.
जिवती-वणी मार्ग ठप्पजिवती : जिवती-रोडगुडा रस्त्यावर चार फूट पाणी वाहत असल्यामुळे काहीजण दोन तास अडकले होते. पुरामुळे जिवती ते वणी, जिवती ते येल्लापूर मार्गावरील शाळा उघडल्या नाहीत. माणिकगड किल्ल्याच्या घाटात झाडे कोसळल्याने गडचांदूर-जिवती, भारी ते शंकरपठार मार्ग बंद आहे. हिमायतनगर येथील गजानन डावले, आनंदगुडा येथील माधव गोरे आदींसह भारी, बाबापूर, असापूर व पहाडावरील अनेक गावांतील पिकांची मोठी हानी झाली.
पोथरा नदीचे पाणी शेतातवरोरा : पोथरा नदीचे पाणी अनेकांच्या शेतात शिरले. वरोरा-वणी महामार्गाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीने सुरक्षा भिंत बांधल्यामुळे पाणी निघण्याचा मार्ग बंद होऊन शेती पाण्याखाली आली. हीच स्थिती वरोरा-चिमूर मार्गालगतच्या शेतीची झाली. तालुक्यातील २५ पेक्षा अधिक घरांची पडझड झाली. माढेळी, वडनेर मार्ग नागरी हिंगणघाट एमआयडीसी दहेगाव, खांबाळा, नागरी, हिंगणघाट व बोडखा मार्गावरील पुलावरून पूर असल्याने सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाहतूक बंद होती.
वेकोलिच्या ढिगाऱ्यांनी घातवेकोलिच्या ढिगाऱ्यांमुळे चंद्रपूर तालुक्यातील चांदसुर्ला गावात मंगळवारी अचानक पाणी शिरल्याने हाहाकार उडाला. घरातील वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांना माहिती मिळताच त्यांनी स्वीय सहायक व विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला गावात पाठविले.
बल्लारपूर तालुक्यात ५० घरांची पडझड विसापूर : बल्लारपूर तालुक्यात बल्लारपूर शहरासह ग्रामीण भागातील सुमारे ५० वर घरांची पडझड झाली त्यामुळे गरिबांचे संसार उघड्यावर आले आहे. बल्लारपूर शहरात अतिवृष्टीने विविध वार्डांत १० तर विसापुरात १० कुटुंबाच्या घरांची पडझड झाली. बामणी (दुधोली) येथे २, चारवट येथे ५, नांदगाव (पोडे) ५, कोठारी येथे १०, मानोरा येथे ३, इटोली येथे २ तर गिलबिली ग्रामपंचायत हद्दीत ३ जणांचे घरे अतिवृष्टीने पडल्याची माहिती आहे. अतिवृष्टीने नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. अतिवृष्टीने तालुक्यात ५० वर घरांची पडझड होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. बल्लारपूर तालुक्यात ५० वर घरांची पडझड झाली. काहींच्या घरांचे अंशत: नुकसान झाले. तर काहींचे निवारा हिरावला आहे. तलाठ्यामार्फत पंचनामे सुरु आहेत.