साईनाथ कुचनकार, चंद्रपूर: येथील महाऔष्णिक विद्युत केंद्रात प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी नोकरभरतीत गैरव्यवहार प्रकरणी १२८ प्रकरणांत चौकशी करण्यात आली. यामध्ये तब्बल ३२ जणांनी प्रपत्र मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचे उघडकीस झाले आहे. त्यामुळे या ३२ जणांवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ७२ जणांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आणखीही काही उमेदवार याप्रकरणी अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता यांच्याकडून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर १२८ व्यक्तींना प्रकल्पग्रस्त प्रपत्र वितरित करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी पथक नेमून चौकशी करण्यात आली. त्यानुसार उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) व त्यांच्या चौकशी पथकाने चंद्रपूर, महाऔष्णिक विद्युत केंद्रात भरती आक्षेप असलेल्या प्रकल्पग्रस्तांची चौकशी करण्यात आली. या पथकाने उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, चिमूर व गोंडपिपरी येथील मूळ भूसंपादनाचे रेकॉर्ड व अर्जदारांनी संलग्न केलेल्या दस्तऐवजाची तपासणी केली. यामध्ये तब्बल ३२ प्रकल्पग्रस्तांनी खोट्या दस्तऐवजानुसार चंद्रपूर उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), कार्यालयातून प्रपत्र प्राप्त करून घेतलेले आढळून आले. याप्रकरणी या उमेदवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची चौकशी अहवालाची प्रत शासनास व चंद्रपूर, महाऔष्णिक विद्युत केंद्रास सादर करण्यात आली असून, ३२ प्रकल्पग्रस्त नामनिर्देशित व्यक्तीविरोधात बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची व चंद्रपूर, महाऔष्णिक विद्युत केंद्राची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत एकूण १२८ प्रकल्पग्रस्तांतर्फे नामनिर्देशित व्यक्तीपैकी पात्र ५६ व अपात्र ७२ व्यक्ती निष्पन्न झाले आहे. या अपात्र ७२ प्रमाणपत्र रद्द करण्याची कार्यवाहीसुद्धा करण्यात आली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून, आणखीही काही उमेदवारांनी अशा प्रकारे प्रपत्र मिळविले का, याची चौकशीही करणे महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे, ७२ अपात्र व्यक्तींपैकी ३२ नामनिर्देशित व्यक्तींनी बनावट कागदपत्रे सादर करून प्रपत्र प्राप्त केल्यामुळे त्यांच्याविरोधात रामनगर पोलिस स्टेशन, चंद्रपूर येथे तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अतुल जताळे यांनी दिली.