लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दाणादाण उडविली आहे. नदी-नाल्यांना पूर आला असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. यातच आता चारा टंचाईला जिल्ह्यातील विशेषत: भद्रावती, राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. मुक्या जनावरांना जगवायचे तरी कसे, अशी चिंता त्यांना सतावत आहे.जिल्ह्यातील मोठ्या नद्या असलेल्या वर्धा, वैनगंगा यासह इरई, झरपट नदी नाल्यांना दोन ते तीन वेळा पूर आला. अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आली नाही. पुराच्या पाण्यामध्ये पिकांचे नुकसान झाले. यासोबतच हिरवा चारा सडला, त्यामुळे सध्या पूरग्रस्त गावांतील नागरिकांना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न पडला आहे. शेतातील पीकही वाया गेले असून दुबार पेरणी करावी लागणार आहे. यासात्री मात्र किमान एक ते दीड महिना वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे शासनाने लक्ष देऊन जनावरांच्या चाऱ्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.
जनावरांना जगवण्याचा प्रश्नपूरग्रस्त गावातील शेतकऱ्यांना जनावरांना जगविणे कठीण झाले आहे. कोरडा चारा पावसाच्या दिवसामध्ये संपला असून, पूर आल्यामुळे शेतातील हिरवा चारा नष्ट झाला आहे. त्यामुळे जनावरांना जगविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. आता पूर ओसरला आहे. मात्र, चिखलामुळे शेतात जाणे कठीण झाले आहे.
सर्वत्र राखेचा थरकाही वर्षांपूर्वी पुराच्या पाण्यात शेती आली तरीही शेतकऱ्यांचे फारसे नुकसान होत नव्हते. शेतामध्ये नदीतील पाण्यासोबत वाहून आलेल्या मातीमुळे शेती सुपीक होत होती. यावर्षी मात्र विशेषत: भद्रावती तालुक्यात पुराच्या पाण्यामध्ये राख आल्याने शेतामध्ये सर्वत्र राख पसरली आहे. यामुळे शेती नापीक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कुटार संपलेबहुतांश शेतकरी पावसाची सोय म्हणून कुटार भरून ठेवतात. यावर्षी सतत कोसळलेल्या पावसामुळे जनावरांना घरीच बांधून ठेवावे लागले. यामध्ये कोरडा चारा संपला आहे.
गवत सडून झाले नष्ट शेकडो हेक्टर जमीन पुराच्या पाण्याखाली आहे. त्यामुळे गवत सडून नष्ट झाले आहे. दुसरीकडे शेत परिसरात सर्वत्र चिखल असल्याने जनावरांना शेतात नेतासुद्धा येत नसल्याची स्थिती आहे.
पुराच्या पाण्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेतकऱ्यांना चाराटंचाईचा सामना करावा लागत आहे. मुक्या जनावरांना कसे जगवायचे, हा प्रश्न पडला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. शासनाने शेतकऱ्यांना मदत करून धीर देण्याची गरज आहे. - संदीप खुटेमाटेअध्यक्ष, अन्नदाता एकता मंच