लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये, यासाठी पोलीस विभागाने अतिशय गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक असलाच पाहिजे. कोणाच्याही दबावाला बळी न पडता जिल्ह्यात पोलिसांचा दरारा दिसू द्या, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पोलीस यंत्रणेला दिले.पोलीस अधीक्षक कार्यालयात कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे आदी उपस्थित होते.
गुन्हेगारांची यादी करा...एमपीडीए कायद्यांतर्गत प्रलंबित असलेली प्रकरणे त्वरित निकाली काढावी. गुन्हेगारांची यादी करा. तसेच कोणताही गुन्हेगार सुटणार नाही, याबाबत पोलिसांनी गांभीर्याने काम करावे. अवैध दारू, बनावट दारूप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि सर्व ठाणेदारांनी चोख कामगिरी करावी.
राजकीय दबावाची पोलीस नोंद ठेवाजिल्ह्याची प्रतिमा मलीन होणार नाही, यासाठी अवैध कोळशाची वाहतूक पूर्णपणे बंद झाली पाहिजे. कोणताही राजकीय दबाव आला किंवा कोणाचाही फोन आला, तर त्याची स्टेशन डायरीला नोंद करा. अवैध कोळसा वाहतुकीबाबत स्पेशल स्कॉड तयार करून धडक कारवाई करावी.
हयगय सहन केली जाणार नाहीअल्पवयीन मुलींची प्रकरणे अतिशय संवेदनशीलपणे हाताळणे गरजेचे आहे. संबंधित पालकांची तक्रार आली, तर पोलीस यंत्रणा कामाला लागली पाहिजे. यात कोणतीही हयगय सहन केली जाणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्र्यांनी दिले निर्देश
- कोळसा अवैध तस्करीवर केंद्रीय तपास यंत्रणेचे लक्ष- जिल्ह्याची बदनामी होऊ देऊ नका, पोलिसांनी सक्त कारवाई करावी.- एक महिन्याच्या आत गुन्हेगार आत दिसले पाहिजे- माझा किंवा आमच्या स्टाफचा फोन येणार नाही, मात्र एखाद्याने बदनामीकरिता आमचे नाव वापरले तर त्याची पोलिसांनी शहानिशा करावी.- राज्याच्या गृहमंत्र्यांच्या कानावर जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्थेची माहिती आहे.