चंद्रपूर : वीज केंद्राची वसाहत असलेल्या ऊर्जानगर येथील न्यू एफ गाळा परिसरातील पर्यावरण चौकात सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात यश आले आहे. वीज केंद्राचे विशेष पथक आणि वनविभागाने राबविलेल्या संयुक्त मोहिमेचे हे यश असल्याचे बोलले जात आहे. जेरबंद झालेला वाघ सुमारे दोन वर्षांचा असून तो नुकताच आईपासून दूर झाला असावा, अशी माहिती वाईल्ड लाईफचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. रविकांत खोब्रागडे यांनी दिली.
वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. रविकांत खोब्रागडे यांच्यासह अजय मराठे, राकेश आहुजा, पवन कुळमेथे, अतुल मोहुर्ले, भाेजराज दांडेकर, अमोल कोरपे, अमोल तिखट, नन्नावरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वाघाला ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. वाघ जेरबंद झाल्याने नागरिकांनी काही प्रमाणात सुटकेचा श्वास घेतला. मात्र बिबट्याची दहशत कायमच आहे.
मागील काही दिवसांपासून ऊर्जानगर व दुर्गापूर परिसरात वाघ आणि बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला. यामध्ये दोघांचा बळी गेला. यात एकाला वाघाने तर एकाला बिबट्याने ठार केले. यापूर्वीही या परिसरात वाघ व बिबट्याचे हल्ले झाले असून अनेकांचा बळी गेला आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच गेल्या चार दिवसांपूर्वी या परिसरात दोघांचा बळी गेल्यामुळे नागरिकांमध्ये वनविभागाबद्दल रोष निर्माण झाला. वाघ व बिबट्याला जेरबंद करून दहशत संपुष्टात आणावी, यासाठी पाच दिवसांपासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी वीज केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले. वाघ पकडत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने जिल्हा प्रशासनाची चांगलीच गोची झाली होती.