नागभीड (चंद्रपूर) : पाहार्णी, ढोरपा आणि तोरगाव शिवारात धुमाकूळ घालून अनेकांचा बळी घेणारी ती नरभक्षक वाघीण अखेर रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास जेरबंद झाली. वनविभागाच्या या कारवाईने परिसरातील नागरिकांनी तूर्तास सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
गेल्या अडीच महिन्यांपासून वाघाने या परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. या परिसरात मागील अडीच महिन्यांपूर्वी पान्होळी येथील गुराखी सत्यवान पंढरी मेश्राम, त्यानंतर तोरगाव येथील जनाबाई तोंडरे ही महिला ढोरपा या गावच्या शेतामध्ये वाघाची बळी ठरली होती, तर ढोरपा येथील सविता भुरले या महिलेवर प्राणघातक हल्ला केला होता. वनिता वासुदेव कुंभरे या महिलेलाही वाघाने हल्ला करून जागीच ठार केले होते. तेव्हाही जनक्षोभ चांगलाच उसळला होता. परिसरातील पाच ते सहा गावांतील सरपंचांनी उपवनसंरक्षक यांना निवेदन देऊन वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. परिणामी दि. ३ डिसेंबरला म्हसली कक्षामध्ये वाघास जेरबंद करण्यात आले होते.
दरम्यान, ३० डिसेंबरला टेकरी येथील नर्मदा प्रकाश भोयर, तर ३१ डिसेंबरला तोरगाव तालुका ब्रह्मपुरी येथील सीताबाई रामजी सलामे या महिलेस वाघाने ठार केले. वाघाच्या हल्ल्यांनी ढोरपा, पाहार्णी आणि तोरगाव परिसरातील गावांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. टेकरी येथे पंचनाम्यास गेलेल्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरून त्वरित वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली होती. दरम्यान, या परिसरात हल्ला करणारा वाघ नसून वाघीण असल्याचे पुढे समोर आले.
वाघीण दिसताच केले जेरबंद
दरम्यान, रविवारी हल्लेखोर वाघीण ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगावच्या शेतशिवारात दिसून आली. वन अधिकाऱ्यांनी तातडीने हालचाली करून या वाघास ट्रॅक्यूलाइझ ऑपरेशन राबवित बेशुद्ध करून जेरबंद केले. यावेळी सहायक वनसंरक्षक महेश चोपडे, के. आर. धोंडणे, ब्रह्मपुरी उत्तरचे वनपरिक्षेत्राधिकारी एम. बी. गायकवाड, डॉ. कुंजन पोरचलवार व अन्य चमू उपस्थित होती.