वासेरा (चंद्रपूर) : शिवनी वनपरिक्षेत्रातील चारगाव येथील श्रीकांत श्रीरामे या युवकाला वाघाने ठार केले. ही घटना रविवारी कुकडहेटी परिसरात उघडकीस आली होती. या घटनेनंतर वनविभागाप्रती नागरिकांमध्ये संताप व्यक्त करताच वनविभागाने कॅमेरे लावून वाघावर पाळत ठेवली. अखेर त्याच परिसरात सोमवारी रात्री वाघ येताच त्याला बेशुद्ध करून जेरबंद केले.
ताडोबा बफर झोनचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांच्या मार्गदर्शनात शिवनी वनपरिक्षेत्र अधिकारी भाऊराव तुपे यांच्या टीमने या वाघाला पिंजऱ्यात जेरबंद करून चंद्रपूरला हलविले. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या श्रीकांत श्रीरामे या युवकाबाबत कुटुंबाला माहिती न देता वनविभागाने रविवारी परस्पर शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात नेला. दरम्यान, मृताचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी आक्षेप घेतल्यानंतर सोमवारी वनविभागाने घटनास्थळावरून मृतदेहाचे दुसऱ्यांदा अवयव गोळा करून रुग्णालयात नेल्याचा प्रकार घडला. मृतदेहाची अशी अवहेलना झाल्याने गावकऱ्यांमध्ये वनविभागाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सिंदेवाही तालुक्यातील चारगाव येथील श्रीकांत श्रीरामे हा युवक दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्यामुळे वडील पटवारू श्रीरामे यांनी सिंदेवाही पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. दरम्यान, रविवारी (दि. ८) वनकर्मचारी ताडोबा बफर झोन क्षेत्रातील शिवनी वनपरिक्षेत्रांतर्गत कुकडहेटी परिसरात गस्त घालत असताना वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या श्रीकांतचा मृतदेह आढळला; परंतु, याबाबत कुटुंबाला माहिती न देता वनविभागाने श्रीकांतचा मृतदेह सिंदेवाही येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेला. या घाईत काही अवयव घटनास्थळावरच राहिले. पोलिसांसमक्ष मोका पंचनामा केला नाही, असा आरोप मृताचे वडील पटवारू श्रीरामे यांनी केला.
नागरिकांचा संताप; वन विभागाची चुप्पी
गावकऱ्यांनीही तीव्र संताप व्यक्त करून वनाधिकाऱ्यांना धारेवर धरले. घटनास्थळावर परिसरातील नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. चूक लक्षात येताच रविवारी सिंदेवाहीचे ठाणेदार योगेश घारे व वनविभागाचे सहायक वनसंरक्षक बापू येडे यांच्या नेतृत्वातील पथकाने घटनास्थळावरून मृतदेहाचे काही अवयव ताब्यात घेऊन सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेले. याबाबत वनविभागाची बाजू समजून घेण्यासाठी शिवणी क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी भाऊराव तुपे यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.
वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या माझ्या मुलाबाबत वनविभागाने माहितीच दिली नाही. त्यांनी पंचनामा न करता परस्पर मृतदेह उचलून सिंदेवाहीला नेला. मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दोन दिवसांपूर्वीच पोलिस स्टेशनला दिली होती.
- पटवारू श्रीरामे, रा. चारगाव, मृत युवकाचे वडील.