प्रमोद येरावार
चंद्रपूरः कोल्हापुरी मिर्चीप्रमाणेच अहेरी-चंद्रपूर मार्गावरील बल्लारपूर तालुक्यातील कोठारीचा लाल मिरचीचा बाजारही मोठा प्रचलित आहे. या बाजारात सर्वच प्रकारची लाल मिरची विक्रीसाठी उपलब्ध असते. दर सोमवारी हा बाजार केवळ चार तास भरतो. मिरची खरेदीसाठी जिल्ह्याभरातून ग्राहक येत असतात. त्यामुळे केवळ चार तासात या बाजारात लाखोंची उलाढाल होत असते. मागील ५० वर्षांपासून हा मिरची बाजार अविरत भरत आहे.
कोठारी आणि लगतचा परिसरात मिरचीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. विदर्भातील भिवापू नंतर हा मोठा मिरची बाजार असल्याचे विक्रेते सांगतात. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून विक्रेते मिर्ची विक्रीकरिता बाजारात हजेरी लावतात. तर परिसरातील शेतकरी बैलबंडी, चारचाकी वाहनाने शेतकरी बाजारात मिरची आणतात. माफक दरात, वेगवेगळ्या जातीची मिरची बाजारात विक्रीला आणली जाते. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागातून मिरची खरेदी करण्यासाठी ग्राहक येत असतात. सकाळी सात वाजता बाजाराला सुरुवात होते. फारफारतर चार तास हा बाजार चालतोय. या चार तासात लाखोची उलाढाल बाजारात होते. कोरोना काळात हा मिरची बाजार ठप्प पडला होता. आता बंधने शिथिल झाली असल्याने बाजार पूर्ववत सुरू झाला आहे.
कोठारीत भरणारा हा बाजार फार जुना आहे. बाजारात परिसरातील शेतकरी शेतातील मिरची विक्रीसाठी आणतात. इथे प्रत्येक जातीची मिरची माफक दरात उपलब्ध असते. त्यामुळे ग्राहकही मोठी गर्दी करीत असतात.
दिपक लोहे, शेतकरी, कोठारी
विदर्भात मिरचीचा सर्वात मोठा बाजार नागपूर जिल्ह्यातील भिवापूर इथे भरतो; मात्र भिवापूरचा बाजार ठोक विक्रीचा असतो. कोठारीच्या बाजारात ठोक तथा मिरचीची चिल्लर विक्री केल्या जाते. माफक दरात मिर्ची मिळत असल्याने जिल्ह्यातील ग्राहक येथे गर्दी करतात.
नीलकंठ देवाळकर, माजी ग्रा. पं. सदस्य, कोठारी.
बाजाराची जुनी परंपरा
कोठारी येथे मिरचीचा बाजार सुमारे ५० वर्षांपूर्वीपासून भरत आहे. आजही ही परंपरा सुरू आहे. येथे जिल्ह्याभरातील विक्रेते वेगवेगळ्या प्रकारची मिरची विक्रीसाठी आणत असतात. त्यामुळे ग्राहकही मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी करीत असतात. सोमवारी कोठारीच्या गाव ‘लाल ही लाल’ दिसत असतो.