चंद्रपूर : राज्यात १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत ३५ वा रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, रस्ते अपघातास आळा बसावा, रस्ता सुरक्षेची जाणीव निर्माण व्हावी, निर्भयपणे रस्त्यावर प्रवास करता यावा यासाठी बुधवार दि. ७ फेब्रुवारी रोजी नियोजन भवन येथून शालेय विद्यार्थ्यांची रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून ‘रस्ते सुरक्षा-जीवन रक्षा’ हा संदेश देण्यात आला.
जनजागृती रॅलीला जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, वाहतूक पोलिस निरीक्षक रोशन यादव, प्रवीणकुमार पाटील, प्रादेशिक परिवहन विभागाचे इतर मोटर परिवहन अधिकारी उपस्थित होते. रॅलीमध्ये भवानजीभाई चव्हाण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर, मातोश्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, रफी अहमद किदवाई हायस्कूल, चांदा पब्लिक स्कूल आणि विद्यानिकेतन हायस्कूल, चंद्रपूर येथील ३०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. सदर रॅली नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय-प्रियदर्शिनी चौक-प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयापर्यंत काढण्यात आली.
पोलिस वाहनावर यमराज
रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती रॅलीमध्ये पोलिस वाहनांवर हेल्मेटची प्रतिकृती व यमराज बसवून हेल्मेटचे जीवनातील महत्त्व पटवून देत रस्ता सुरक्षेचे महत्त्व स्लोगन व चित्ररथाद्वारे समजावून सांगण्यात आले. हे वाहन संपूर्ण जिल्हाभरात फिरणार असल्याची माहिती आरटीओ किरण मोरे यांनी दिली.