लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : गेल्या आठ वर्षांपासून मौशी येथील ओबीसी समाज घरकुलांपासून वंचित आहे. या समाजाला ओबीसी कोट्यातून घरकुलांचा लाभ देण्यात यावा, अशी मौशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.
मौशी हे गाव तालुक्यातील एक मोठे गाव असून, गावची लोकसंख्या साडेचार हजारांच्या आसपास आहे. या गावात ओबीसी समाजाची लोकसंख्या गावच्या एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के आहे. असे असले तरी २०१६ पासून या गावात ओबीसींना घरकुलाचा लाभ देण्यात आला नाही. गावात ओबीसींना घरकुलांचा लाभ मिळावा, यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वच प्रशासकीय पातळीवर आणि आमदार, खासदार यांच्याकडे पाठपरावा केला. एवढेच नाही तर हे पदाधिकाऱ्यांनी मुंबईला जाऊन मंत्रालयातही पाठपुरावा केला. मात्र, या पाठपुराव्याला आजपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आपल्या समस्येची दखल घेतली आहे, असेच उत्तर देण्यात येत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
मिळणाऱ्या घरकुलांची नितांत गरज आहे. अनेकांची घरे मोडकळीस आली असली तरी परिस्थितीमुळे घरे बांधू शकत नाही. असे असले तरी शासन आणि प्रशासन यांच्याकडून मौशीबाबत केवळ वेळकाढूपणा सुरू असल्याने मौशी येथील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
"या गावात ओबीसी समाजातील अनेक व्यक्तींना शासनाकडून २०१६ पासून मौशी या गावातील ओबीसी समाज घरकुलांपासून वंचित आहे. गेल्या पाच सहा वर्षांपासून मी या समस्येचा पाठपुरावा शासन व प्रशासन पातळीवर करीत आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी यासाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला आहे; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही."- रामकृष्ण देशमुख, माजी उपसरपंच, मौशी