वरोरा (चंद्रपूर) : वर्धा व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नदीच्या पात्रात वाघाचा मृतदेह आढळला होता. त्याचे शवविच्छेदन रविवारी चंद्रपुरात करण्यात आले. वाघाच्या मृत्यूचे कारण तूर्तास समोर आले नसले तरी वाघाचे संपूर्ण अवयव शाबूत असल्याने वनविभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला असल्याचे दिसून येत आहे.
चंद्रपूर वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर वाहणाऱ्या पोतरा नदीच्या पात्रात वाघाचा मृतदेह ११ फेब्रुवारी रोजी आढळून आला. यामध्ये सीमा वादावरून चंद्रपूर वर्धा जिल्हा वनविभागमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे वाघाचा मृतदेह काही तासापर्यंत घटनास्थळावरच होता. अखेरीस चंद्रपूर वन विभागाच्या वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाघाचा मृतदेह ताब्यात घेऊन ११ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरापर्यंत चंद्रपूर येथे शवविच्छेदनाकरिता देण्यात आला.
१२ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनात वाघाला विद्युत शॉक लागला नसल्याचे प्राथमिक अंदाज असून मृत वाघाचे सर्व अवयव शाबूत असल्याने त्याचा मृत्यू शिकारीसाठी झाला नसल्याचे वर्तविले जात आहे. वाघ हा नर जातीचा असून अंदाजे वय साडेतीन वर्षं आहे.
वाघाचा मृत्यू हिट अँड रनमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज शवविच्छेदन अहवालात दिसून येत आहे. पुढील परीक्षेसाठी मृत वाघाचे अवयव प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. तो अहवाल आल्यानंतर वाघाच्या मृत्यूचे कारण सांगता येईल
- सतीश शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वरोरा