लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दरडोई उत्पन्नाचे मोजमाप हे त्या-त्या क्षेत्राचे एकूण उत्पन्न व एकूण लोकसंख्या यांचा भागाकार करून काढले जाते. देशाचे दरडोई उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्न व एकूण लोकसंख्या यांची सरासरी करून काढली जाते, तसेच प्रत्येक राज्याचे तेथील एकूण उत्पन्न व एकूण लोकसंख्या यांची सरासरी करून एखाद्या राज्याचे दरडोई उत्पन्न काढले जाते. चंद्रपूर जिल्ह्याचे २०२३-२४ चे दरडोई उत्पन्न हे २ लाख २५ हजार रुपये असल्याचे वास्तव समोर आले आहे.
एकूण उत्पन्न म्हणजे विशिष्ट क्षेत्र किंवा देशातील विशिष्ट कालावधीतील उत्पन्न, यात मजुरी, पगार, व्यवसायातील उत्पन्न आदींचा समावेश होतो. आर्थिक वाढ आणि सुधारणांच्या विस्तारामुळे अर्थव्यवस्थेचा एकूण आकार वाढतो. यामुळे दरडोई उत्पन्नात वाढ होते. दरडोई उत्पन्न निश्चित करण्यात लोकसंख्येचा आकारदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. क्षेत्राची कौशल्य आणि शैक्षणिक धोरणेदेखील दरडोई उत्पन्नाचे निर्धारक आहेत. कारण त्याचा थेट परिणाम त्या अर्थव्यवस्थेच्या उत्पादकता आणि श्रमिक बाजारावर होतो. दरम्यान, जिल्ह्यातील उद्योग, रोजगाराच्या संधी यावरही दरडोई उत्पन्न ठरते. विशेष म्हणजे, शेती उत्पादन, होणारे पीक आणि मिळणारा बाजार भाव हे सुद्धा दरडोई उत्पनासाठी आवश्यक आहे.
वापर कशासाठी ?दरडोई उत्पन्नाचा वापर अनेक वेळा प्रदेश, जिल्ह्याची अर्थव्यवस्था किती चांगली आहे. हे दाखविण्यासाठी केला जातो. प्रत्येक व्यक्ती एखाद्या क्षेत्रात जितके जास्त पैसे कमवेल, तितके जास्त पैसे त्यांना वस्तू आणि सेवांवर खर्च करावे लागतील. यामुळे या बदल्यात, उच्च जीवनमान होऊ शकते. दरडोई उत्पन्न कमी असतानाही शिक्षण, आरोग्यसेवा आणि सामाजिक सेवांवर परिणाम होतो.
उत्पन्न स्रोत संकल्पनेचा अवलंब जिल्हास्तरावरील उत्पन्नाचेअचूक अंदाज बांधण्यासाठी प्रदेशाला संचयित होणारे उत्पन्न ही संकल्पना वापरणे योग्य असली तरी जिल्हास्तरावरील आर्थिक उलाढालीचा परिणाम जिल्ह्यापुरताच मर्यादित राहत नाही. जिल्ह्याला ₹ बाहेरून प्राप्त होणारे व संबंधित जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या उत्पन्नाचे मोजमाप करणे शक्य नाही. यामुळे सदर पद्धतीचा वापर करता येत नाही. परिणामी, उत्पन्न स्रोत पद्धती या संकल्पनेचा अवलंब करून जिल्हास्तरावरील उत्पन्नाचे अंदाज तयार करण्यात आले आहे.