परिमल डोहणे
चंद्रपूर : ख्यातनाम व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेला ‘कॉमन मॅन’ आजही विचारत आहे. याच कॉमन मॅनचा आधार घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून सिंदेवाही पोलिस स्टेशनमध्ये एक व्यंगचित्र असलेले फलक लावले आहे. या फलकावर एक पोलिस व एक नागरिक एकमेकांच्या खाद्यावर हात टाकून असल्याचे दाखवत ‘अन्यायाला नाही भिणार, पण तू माझा आधार हो, सज्जनाच्या रक्षणाला तू सदा तयार हो, गरिबाला न्याय देई, कायद्याची शाई, सज्जनाच्या रक्षणाला पोलिस सदा साथ देई’, सर्वसामान्याला दिलासा देणाऱ्या अशा ओळी लिहिल्या आहेत. दर्शनी भागावर असलेले हे फलक पोलिसांचे दिलासा देणारे चित्र रेखांकित करत असल्याने सर्वांचेच लक्ष वेधत आहे.
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद जोपासत पोलिस सेवा देत असतात. दिवस असो की रात्र कोणत्याही अडचणींसाठी ते सदैव तत्पर असतात. सर्वसामान्य नागरिक व पोलिसांचे नाते सुसंगत असावे, यावेळी पोलिस विभाग नवनवे उपक्रम राबवित असताना दिसून येतात. याच अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या निर्देशानुसार सिंदेवाही पोलिसांनी ‘कॉमन मॅन’ ही संकल्पना केंद्रबिंदू ठरवून पोलिस स्टेशनच्या दर्शनी भागावर व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांची काढलेली व्यंगचित्रे प्रकाशित केली आहेत. त्यामध्ये एक पोलिस व एक नागरिक एकमेकांच्या खाद्यांवर हात ठेवून असल्याच्या व्यंगचित्राचाही समावेश आहे.
सर्वसामान्य नागरिक व पोलिस याचे असेच सलोख्याचे संबंध राहावे, ठाण्यात न्यायासाठी आलेला प्रत्येक नागरिक हा समाधानाने व न्याय घेऊनच बाहेर पडावा हाच याचा उद्देश असून ते सर्वांचे लक्ष वेधत असल्याचे दिसून येत आहे. नुकतीच जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सिंदेवाही पोलिस ठाण्याला भेट दिली. त्यांनी हे व्यंगचित्र तसेच त्यावरील मजकूर वाचून सिंदेवाही पोलिसांचे कौतुक केले. यावेळी सिंदेवाहीचे पोलिस निरीक्षक तुषार चव्हाण उपस्थित होते.
पोलिसांची अनोखी मानवंदना
ज्येष्ठ व्यंगचित्रकार पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त आर. के. लक्ष्मण यांचे ‘कॉमन मॅन’ हे एक व्यंगचित्र पात्र आहे. आर. के. लक्ष्मण यांना सर्वसामान्य भारतीयांच्या मानसिकतेचे अचूक भान होते. त्यांनी तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ सामान्य भारतीयांच्या आशा, आकांक्षा, संकटे आणि अपयशाचे प्रतिनिधित्व केले आहे. कॉमन मॅन हा पोलिसांसाठी सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळे कॉमन मॅनला केंद्रबिंदू धरून आर. के. लक्ष्मण यांना मानवंदना देण्याच्या अनुषंगाने हे फलक लावले असल्याचे सिंदेवाही ठाण्याचे पोलिस निरीक्षक तुषार चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.