लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे. शनिवारी पारा ४४ अंशावर, तर रविवारीही ४४.२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान होते. त्यामुळे सकाळपासूनच उन्हाचे चटके बसत होते. या वाढत्या तापमानामुळे आरोग्याच्या तक्रारीही वाढत आहे. त्यासाठी काळजी घेणे हा सर्वोत्तम उपचार आहे. हवामान विभागाने उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार, विदर्भात खासकरून चंद्रपूर येथे तापमान सारखे वाढत आहे. तापमान वाढल्यामुळे सकाळी ९ वाजतापासून कूलर, एसी सुरू करावे लागत आहे. बाहेर निघाल्यानंतर अंगाला चटके देणारे उन्ह असल्याने अनेक जण घराबाहेर पडणेही टाळत आहे. दरम्यान, ग्राहक दुपारच्यावेळी खरेदीसाठी येत नसल्याने काही व्यावसायिक दुपारच्या वेळी दुकाने बंद ठेवत आहे.
पाण्याची बाटली सोबत ठेवासध्याचे उन्ह बघता कामाशिवाय बाहेर पडू नये. अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा आणि सोबत एक पाण्याची बाटली ठेवा.
पाणीदार फळांचे सेवन कराजिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे जीवाची लाहीलाही होत आहे. अशा वेळी आरोग्यासाठी पाणीदार फळांचे सेवन करणे फायदेशीर आहे. टरबूज, खरबूज, द्राक्ष, नारळपाणी आदींची सेवन करण्याचा सल्ला डाॅक्टर देत आहेत.