तोहोगाव (चंद्रपूर) : आठवडाभरापासून धुमाकूळ घालणारा वाघ गावालगतच्या झुडपांत असल्याची माहिती मिळताच लोकांनी हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी चवताळलेल्या वाघाने जमावावरच हल्ला चढवला. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले.
ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव वनक्षेत्रात गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. यात शरद बोपनवार (रा. तोहोगाव) आणि सुरेश मत्ते (रा. विरुर स्टेशन) अशी जखमींची नावे आहेत.
गेल्या काही दिवसांपासून गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव, आर्वी व वेजगाव परिसरात वाघाने धुमाकूळ सुरू केला आहे. आठवडाभरापूर्वी वाघाने हल्ला करून पाच बैल, बकरी व म्हशीला ठार केले होते. तेव्हापासून वाघाचे याच परिसरात बस्तान आहे. दहशतीमुळे नागरिक रात्र जागून काढत आहेत. पोलीस व वन कर्मचारी संयुक्त गस्त घालत आहेत. परंतु वन विभागाने वाघाला जेरबंद करण्याची मोहीम गंभीरपणे घेतली नाही.
दरम्यान, आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास तोहोगाव-आर्वी मार्गातील नाल्यालगतच्या झुडपांत वाघ दडून असल्याची वार्ता पसरताच नागरिकांनी वाघाला पाहण्यासाठी धाव घेतली. वन कर्मचाऱ्यांनी लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करूनही काही व्यक्तींनी वाघाला हुसकावण्यासाठी दगडफेक केल्याची चर्चा आहे. त्यामुळे चवताळलेल्या वाघाने लोकांच्या दिशेने हल्ला चढविला. दरम्यान, लाेकांची पळापळ सुरू झाली. वाघाने हल्ला केल्याने शरद बोपणवार व सुरेश मत्ते हे दोघे जखमी झाले. त्यांना तत्काळ तोहोगाव आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. हा वाघ त्याच परिसरात असल्याची चर्चा आहे.
वन विभागाने लावला पिंजरा
तोहोगाव, आर्वी व वेजगाव परिसरात वाघाचा संचार सुरू असल्याने वन विभागाने तोहोगाव-आर्वी मार्गालगत एक पिंजरा लावला. कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघाचा संचार दिसत असताना पिंजऱ्यांची संख्या का वाढविली नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
तीन गावांत दहशत
आठवडाभरापासून वाघाचा धुमाकूळ सुरू असल्याने तोहोगाव, आर्वी व वेजगाव परिसरात प्रचंड दहशत सुरू आहे. वाघाने हल्ला केल्याने नागरिक संतप्त झाले असून, केवळ देखावा म्हणून एक पिंजरा लावल्याचा आरोप होत आहे.