चंद्रपूर : कामावरून परत येत असताना एका खासगी कंपनीच्या कामगाराला वाघाने भरवस्तीतून उचलून नेले. ही थरारक घटना माजरी गावात सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. रात्री ११ वाजताच्या दरम्यान वस्तीलगत अंदाजे २०० मीटर अंतरावर त्या कामगाराचा मृतदेह सापडला. दीपू सियाराम महतो (३८) रा. वाॅर्ड क्र. १ न्यू हाउसिंग असे मृताचे नाव आहे. या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी शावेल चौक येथे धरणे देत वेकोलिची कोळसा वाहतूक रोखून धरली.
माजरी येथील विकास कोल या खासगी कंपनीमध्ये हेल्पर पदावर कार्यरत दीपू महतो सोमवारी रात्री कामावरून घरी जात होता. दरम्यान, दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक दीपूवर हल्ला करून त्याला उचलून नेले. घरामागे ओरडण्याचा आवाज येताच शेजारच्या महिलेने आवाजाच्या दिशेने शोध घेतला असता चक्क वाघ आपल्या जबड्यात त्याला पकडून नेत असल्याचे भयावह दृश्य दिसले. हे बघून तिने आरडाओरड केली. शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली. सुमारे ३०० नागरिक हातात आगीचा टेंभा घेऊन दीपूचा शोध घेण्यास निघाले. दोन तास शोध घेतल्यानंतर दोनशे मीटर अंतरावर वस्तीलगत वेकोलिच्या परिसरात एका झुडपात त्याचा मृतदेह आढळला. दिवाळीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने त्या मार्गावरून येणे-जाणे करणाऱ्या नागरिकांसह वेकोलि कर्मचारीही भयभीत झाले आहेत. माजरी पोलीस व वनविभागाने नागरिकांच्या साहाय्याने शोधमोहीम राबवून मृतदेह शोधून काढला. वनविभागाकडून वाघाला पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले.
वाघाचे दर्शन
चारगाव, तेलवासा या खाणीच्या परिसरात हा वाघ आला असल्याचा अंदाज आहे. आधी एनएमओसी, मग एकता नगर आणि चड्डा कंपनीच्या परिसरात तो दिसला होता. यापूर्वीही माजरी परिसरात एक वाघीण व तिच्या तीन बछड्यांचे बस्तान होते. दरम्यान, चारगाव खाण परिसरातून वाहणाऱ्या शिरना नदीच्या पुलावरून एका वाघाने उडी मारल्याने नदीपात्रातील दगडात अडकून त्याचा मृत्यू झाला.
संतप्त नागरिकांनी केले वेकोलिचे कोळसा उत्पादन ठप्प
या घटनेने संतप्त नागरिकांनी शावेल चौक येथे मंगळवारी धरणे देत वेकोलिची कोळसा वाहतूक रोखून धरली. ठाणेदार विनीत घागे यांनी दंगा नियंत्रण पथकाला पाचारण केले. मृताला शासनाच्या मदतीव्यतिरिक्त वेकोलिने अतिरिक्त आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली. काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी व ठाणेदार विनीत घागे यांच्या मध्यस्थीने वेकोलि अधिकारी व संतप्त नागरिकांमध्ये तडजोड झाली. या बैठकीत वेकोलिकडून योग्य ती आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले.
या परिसरात वाघ असल्याची माहिती चार दिवसांपूर्वी मिळाली होती. परिसरात चार वाघांचा वावर असल्याचा अंदाज आहे. सूर्यास्तानंतर कॅमेरा लावून वाघांचा शोध घेऊन जेरबंद करण्यात येईल.
-विकास शिंदे, क्षेत्रीय सहायक, वनविभाग भद्रावती
माजरी परिसरात काही दिवसांपासून वाघांचा वावर सुरू आहे. नागरिकांनी नरभक्षक वाघाला जेरबंद करेपर्यंत एकटे बाहेर जाऊ नये. सुरक्षेच्या दृष्टीने सोबत टाॅर्च व काठी घेऊन जावे.
-आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा.