चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने चंद्रपुरातील दादमहल वाॅर्डातील हनुमान खिडकीजवळील गोंडकालीन किल्ला परकोटाची पडझड झाली. याच किल्ल्यापासून बाबूपेठकडे जाण्याचा मार्ग आहे. दररोज शेकडो नागरिक येथून ये-जा करतात. बुरूज ढासळून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चंद्रपुरातील गोंडराजांनी बांधलेला परकोट व किल्ला नैसर्गिक आपत्तीपासून वाचवू शकतो, अशी रचना आहे. इरई नदीला आलेल्या पुरामुळे रहमतनगर, सिस्टर कॉलनी व वडगाव परिसरातील वस्ती जलमय झाली. मात्र, गोंडराजांचा परकोट असलेल्या विठ्ठल मंदिर, दादमहल व अन्य वाॅर्डांना पुराचा काहीही परिणाम झाला नाही. याचा अर्थ हा परकोट दूरदृष्टी ठेवूनच बांधण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, परकोट व किल्ल्यांचा कालावधी शेकडो वर्षांचा असल्याने आता काही भाग ढासळू लागला आहे.
पुरातत्व विभागाने घ्यावी दखल
दादमहल हनुमान खिडकीजवळील परकोटाचा काही भाग पावसामुळे ढासळला. संभाव्य धोका लक्षात घेऊन काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक नंदू नागरकर यांनी तातडीने मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांच्या लक्षात आणून दिली. शिवाय, पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनाही कळविले. ढासळत असलेल्या किल्ल्याला लागून नागरिक ये-जा करू नये, यासाठी प्रतिबंध म्हणून मनपाने बॅरिकेटस् लावले आहेत.
ते धोकादायक खड्डे बुजविले
अतिवृष्टीमुळे दादमहल वाॅर्डातील गोंडकालीन किल्ला ढासळण्यासोबतच पठाणपुरा ते स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी पुलावर दोन मोठे खड्डे पडले होते. दुरुस्ती झाली नसती तर अपघाताचा धोका होता. माजी नगरसेवक नंदू नागरकर यांच्या प्रयत्नांमुळे हे दोन मोठे खड्डे लगेच बुजविण्यात आले.
चंद्रपूर शहराच्या सुरक्षेसाठी गोंडकालीन किल्ल्यांची दरवर्षीच उपयुक्तता सिद्ध होत आहे. कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या किल्ल्याचा किंवा परकोटाचा भाग सुरक्षित कसा राहील, यासाठी मनपा प्रशासन व पुरातत्व विभागाने संयुक्त उपाययोजना करावी. दादमहल वाॅर्डातील परकोटाचीही कायमस्वरुपी डागडुजी केली पाहिजे.
-नंदू नागरकर, माजी नगरसेवक, चंद्रपूर