चंद्रपूर : ताडोबा अंधारी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली बफर क्षेत्रात सीतारामपेठ येथे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ‘आभासी भिंत’ निर्माण केली जात आहे. या भिंतीमुळे मानव-वन्यजीव संघर्षाची तीव्रता रोखण्यास मदत होईल, असा दावा ताडोबा व्यवस्थापनाने केला. अशा प्रकारचा भिंत तयार करणारा ताडोबा देशातील पहिलाच व्याघ्र प्रकल्प असल्याचे समजते.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघाचे हमखास दर्शन होत असल्याने जगभरातील पर्यटकांची पावले चंद्रपूरकडे वळली. मात्र, मानव व वन्यजीव संघर्ष टोकाचे रूप धारण करीत आहे. वाघाच्या हल्ल्यात आठवड्यातून एकाच जीव जातो. या पार्श्वभूमीवर ताडोबा व्यवस्थापनाने ‘आभासी भिंत’ निर्माणाची प्रक्रिया सुरू केली. या भिंतीमुळे एक वास्तविक वेळ निरीक्षण प्रणाली तयार करून मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यास मदत होईल. वाघांच्या हालचाली शोधून वनाधिकाऱ्यांना इशारा दिला जाईल. वनगावांचे संरक्षण करण्यासाठी ही संरक्षण प्रणाली वापरण्याच्या दिशेने ताडोबा व्यवस्थापनाचे प्रयत्न सुरू आहेत.
कशी आहे आभासी भिंत?
‘क्लाऊड सर्व्हर’वर प्रतिमा प्रसारित करण्यास सक्षम कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून प्रक्रिया केली जाईल. कॅमेऱ्यात मिळविलेल्या प्रतिमेची डेटाबेसशी तुलना करून वाघ ओळखण्यासाठी ‘मशीन लर्निंग अल्गोरिदम’ वापरण्यात येईल. कॅमेऱ्यात वाघ दिसल्यास वनाधिकाऱ्यांना ई-मेल व संदेशांच्या स्वरूपात अलर्ट केले जाईल.
‘आभासी भिंत’ प्रणाली हे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान कार्यान्वित करण्यासाठी व्हॅलिअन्स सोल्युशन्ससोबत ताडोबा प्रशासनाची भागीदारी आहे. संकटांना तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेला एक उत्कृष्ट पर्याय ठरेल. यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका कमी करण्यात मोठी मदत होणार आहे.
- कुशाग्र पाठक, उपसंचालक, ताडोबा बफर झोन